नोकरीत फसवणूक, पतीकडून मानसिक छळ; अखेर महिला कबड्डीपट्टूने टोकाचे पाऊल उचलले
Marathi December 09, 2025 07:25 PM

आर्थिक संकट, नोकरीचे आमिष दाखवून केलेली फसवणूक आणि पतीकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून महिला कबड्डीपट्टूने जीवन संपवले. नागपूरच्या सावनेर परिसरात ही घटना घडली असून याप्रकरणी सावनेर पोलिसात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेळाडूच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. किरण सूरज दाढे असे मयत खेळाडूचे तर स्वप्निल जयदेव लांबघरे असे आरोपी पतीचे नाव आहे.

किरणच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिला नोकरीची आवश्यकता होती. स्वप्निलने किरण आणि तिच्या भावाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवत 2020 मध्ये तिच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह केला. लग्नानंतर किरण माहेरीच राहत होती. लग्नानंतर स्वप्निल नोकरी लावून देण्यास टाळाटाळ करत होता. तसेच नातेसंबंधासाठी दबाव, शिवीगाळ आणि धमक्या देत होता.

अखेर किरणने घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात धाव घेतली. किरणने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र तरीही स्वप्निल तिला वारंवार मानसिक त्रास देत होता. स्वप्निलच्या त्रासाला कंटाळून किरणने 4 डिसेंबर रोजी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तीन दिवसांनी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 108 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी स्वप्निलविरोधात गुन्हा दाखल केला. स्वप्नील सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.