वनखात्यात टक्केवारीचा खेळ
निविदा प्रक्रियेत खासगी व्यक्तीचा हस्तक्षेप
पालघर, ता. १४ : पालघर जिल्ह्याच्या डहाणू उपवनसंरक्षक कार्यालयाअंतर्गत विविध वन परिक्षेत्रांच्या हद्दीत भौतिक कामांसाठी राज्य वन विभागाकडून १० कोटींपेक्षा अधिकचा निधी आला आहे, मात्र हा निधी खर्च करताना निविदा प्रक्रियेत अधिकारीवर्गाकडून टक्केवारीसाठी खासगी व्यक्तीचा हस्तक्षेप केला जात असल्याचा गंभीर आरोप निविदाकारांकडून करण्यात आला आहे.
डहाणू उपवनसंरक्षक कार्यालयासाठी वन विभागाकडून कोट्यवधींचा निधी निवासस्थाने (वन अधिकारी, वन रक्षक, वनपाल यांच्यासाठी) नव्याने बांधण्यासाठी वितरित करण्यात आला आहे. प्रत्येक निवासस्थानासाठी अंदाजे २६.५० लाख ते २९.६० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. दहिसर, पालघर, सफाळे, भाताणे, बोर्डी आणि मनोर वन परिक्षेत्रांत ही कामे होणार आहेत. नियमानुसार आवश्यक नसतानाही, निविदाकारांना जिओ टॅगिंग आणि स्थळ पाहणी दाखल्याची अट घालण्यात येत आहे. यासाठी संबंधित वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवावे लागते.
नाव न घेण्याच्या अटीवर काही निविदाकारांनी दिलेल्या माहितीनुसार, ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी अधिकारीवर्गाकडे गेल्यास त्यांना निविदा भरण्यापूर्वी एका खासगी व्यक्तीची भेट घेण्यास सांगितले जात आहे. यामुळे निविदा प्रक्रियेत खासगी व्यक्तीचा हस्तक्षेप वाढला असून, वन विभागाचे अधिकारी खासगी व्यक्तीच्या संगनमताने टक्केवारीच्या गणितात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, मर्जीतल्या ठेकेदाराला काम देण्याचा घाट घातला जात असल्याची शंका निविदाकारांनी व्यक्त केली आहे.
ही कामे मजूर सहकारी संस्था आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी आरक्षित असूनही, होणाऱ्या गैरव्यवहारामुळे या लाभार्थींना कामापासून दूर राहावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
------------------
कामाचा वाढता आलेख
दहिसर वन परिक्षेत्र कार्यालयअंतर्गत सुमारे सहा कामे असून, तीन कामे प्रत्येकी २६,५१,५३२ जवळपासच्या रकमेची आहेत, तर तीन कामे २९,६२,६१० रकमेची आहेत. पालघर वन परिक्षेत्र अंतर्गत २६५१५३२ जवळपासच्या रकमेची चार कामे आहेत. सफाळे वन परिक्षेत्रअंतर्गत २६,५१,५३२ रकमेची नऊ, तर २९,६२,६१० चे एक काम आहे. भाताणेअंतर्गत २९,६२,६१० चे एक, तर २६,५१,५३२ चे एक काम आहे. बोर्डीअंतर्गत १,३५,९२,९९० एवढ्या रकमेची पाच कामे आहेत, तर मनोर परिक्षेत्र कार्यालयसाठी ४१,९५,१२७ इतक्या रकमेची निविदा काढण्यात आली आहे. ही सर्व कामे निविदा प्रक्रियेवर असून, याव्यतिरिक्त आणखीन अनेक कोटींची कामे यापुढे काढली जाणार आहेत.
------------------
निविदाकारांनी संबंधित कामाचे जिओ टॅगिंग करून स्थळ पाहणी अहवाल माझ्या समक्ष दिल्यानंतर त्यांना निविदा भरण्यासाठी आवश्यक असलेले आमचे ना हरकत प्रमाणपत्र मी नियमानुसार देत आहे, असा कोणताही प्रकार घडलेला नाही.
ऋषिकेश वाघमारे, वन परिक्षेत्र अधिकारी, दहिसर वन परिक्षेत्र