जळगाव: थंडीने उच्चांक गाठताच बाजारात वांग्यांची आवकही वाढली असून, चवदार व दर्जेदार भरिताच्या वांग्यांना सध्या मोठी मागणी आहे. विशेषतः भरितासाठी लागणाऱ्या काळ्या, जांभळ्या आणि गोल वांग्यांची मागणी वाढल्याने शहर व ग्रामीण भागात भरीत पार्ट्यांचा ट्रेंड पुन्हा जोर धरू लागला आहे. शहरात रोज शंभर क्विंटल वांगे मार्केटमध्ये दाखल होत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
गावाकडील शेतशिवारात ताज्या वांग्यांची काढणी सुरू झाली असून, बाजारात थेट शेतकऱ्यांकडून येणारे वांगे ग्राहकांच्या पसंतीस उतरतात. लाकडाच्या कोळश्यावर भाजलेले वांगे, त्यात मिसळलेली कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची, लसूण व तेलाचा खास ठेचा यामुळे भरीताचा स्वाद अधिकच खुलतो. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी, स्नेहसंमेलने तसेच कुटुंबीयांच्या भेटीत भरीत पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे.
भाजीपाला बाजारात सध्या वांग्यांचे दरही तुलनेने परवडणारे असल्याने सर्वसामान्य ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. एकीकडे शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असताना, दुसरीकडे शहरातील खाद्यसंस्कृतीत पुन्हा एकदा भरिताने मानाचे स्थान पटकावले आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत वांग्यांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
१२० रुपये दराने विक्री
शहरात सध्या १२० रुपये दराने भरिताच्या वांग्यांची विक्री केली जात आहे. तर काही ठिकाणी १०० रुपये किलोने हे वांगे विक्री केले जात आहे. बाजारात मागणी वाढल्याने अनेक ठिकाणी विक्रेत्यांचे स्टॉल दिसू लागले आहेत. तसेच भरितासाठी लागणारी कांद्याची पात १० रुपये जुडी प्रमाणे विक्री होत आहे.
थंडी वाढल्याने मागणी
गेल्या आठवडाभरापासून थंडीत कमालीची वाढ झाल्याने भरिताच्या वांगण्यांना पसंती दिली जात आहे. तसेच भरीत पार्ट्या देखील मोठ्या प्रमाणावर केल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Vel Amavasya 2025: 19 की 20 कधी साजरी केली जाणार 'वेळ अमावस्या' ? जाणून घ्या तारीख, धार्मिक महत्त्व अन् परंपरामागणी वाढल्याने दररोज सुमारे २५० किलो वांगे मागवावे लागत आहेत. हिवाळ्यात भरितासाठी वांग्यांना अधिक पसंती दिली जात असल्याने मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे.
- संगीता देशमुख, विक्रेता