Jalgaon Accident : न्याय मिळाला, पण १८ वर्षांनी! रावेर अपघातातील जखमीला लोकन्यायालयात ₹२ लाख ३० हजार नुकसान भरपाई
esakal December 15, 2025 04:45 PM

जळगाव: तब्बल १८ वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर लोकन्यायालयात जखमीला शनिवारी (ता. १३) नुकसान भरपाई मिळाली आहे. जखमी राजेंद्र उर्फ राजीव सुरेश लहासे यांचा २००७ मध्ये रावेर पोलिस ठाणे हद्दीत रस्ता अपघात झाला होता.

अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. जखमी राजेंद्र लहासे हे केळीचे घड वाहण्याचे काम करतात. ११ जून २००७ ला वाहनात (एमएच २१, एस २६६१) केळीचा माल भरून याच गाडीत मालाबरोबर वाघोदा ते रावेर प्रवास करीत असताना अचानकपणे वाहन चालकाचे नियंत्रण सुटले व भरधाव वाहनाचा तोल जाऊन गाडी रस्त्याच्या कडेला चारीत पडली. त्यामुळे वाहनाच्या वर मालासोबत बसलेले राजेंद्र उर्फ राजीव सुरेश लहासे हे खाली पडले व त्यांना मुका मार व जखमा झाल्या होत्या.

जखमीने औषधोपचारासाठी विविध रूग्णालयात उपचार घेतला असता त्यास जवळपास तीस हजार औषधोपचाराकामी खर्च लागलेला होता. या औषधोपचारापोटी झालेला खर्च वसूल करण्यासाठी जखमीने वाहनचालक भास्कर नामदेव पाटील (रा. केन्हाळे, ता. रावेर), गाडी मालक राजेंद्र बाजीराव गरडेकर (रा. नाशिक) व या गाडीची विमा कंपनी न्यू इंडिया इंश्युरन्स कंपनी यांच्याविरुद्ध मोटर अपघात नुकसान भरपाई प्राधिकरण जळगाव येथे मोटर वाहन कायद्याखाली दावा दाखल केला होता.

दाव्याची २०२१ पर्यंत रितसर सुनवाई चालली परंतु २०२१ ला मोटर अपघात प्राधिकरणातील काही प्रकरणे हे भुसावळ येथील न्यायालयात वर्ग झाल्याने पुनःश्च दावा नव्याने सुरू करण्यात आला. असे असताना हा दावा पुन्हा अर्जदाराच्या अर्जावरून जळगाव येथील मोटर अपघात दावा प्राधिकरणात वर्ग करण्यात आला. परंतु, या सर्व प्रक्रियेला तब्बल १८ वर्ष लागले. शेवटी अर्जदाराच्या व त्यांच्या वकिलांच्या विनंतीवरून हा दावा हा लोक न्यायालयात वर्ग करण्यात आला.

Winter Session 2025: Laxman Hake, Mangesh Sasane वर हल्ले, सभागृहात Dhananjay Munde काय म्हणाले? | Sakal News

...असे चालले कामकाज

दरम्यान, शनिवारी (ता. १३) झालेल्या लोकन्यायालयात हा दावा निकाली काढण्यात आला व अर्जदाराला नुकसान भरपाईपोटी रक्कम दोन लाख ३० हजार देण्याची मान्यता मिळाली. अर्जदारातर्फे लोकन्यायालयात ॲड. श्रेयस महेंद्र चौधरी व त्यांचे सहकारी यांनी कामकाज पाहिले व या दाव्यातील दैनंदिन कामकाज हे ॲड. सचिन श्रावणे यांनी पाहिले. तसेच, विमा कंपनीतर्फे ॲड. सी. एच. निकम यांनी कामकाज पाहिले; तर लोकअदालतीचे पॅनल अध्यक्ष म्हणून एस. आर. भांगडिया- झवर (जिल्हा न्यायाधीश ३) व पॅनल सदस्य ॲड. नेहा खैरनार यांच्यासमक्ष हुकूमनामा करण्यात आला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.