Ajit Pawar Rashtrawadi: महापालिका निवडणूक आता हातातोंडाशी आली आहे. भाजप-एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात अनेक ठिकाणी दिलजमाई झाली आहे. तर इतर ठिकाणी नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दादांच्या राष्ट्रवादीला भाजप आणि शिंदे सेनेसोबत जुळवून घेण्यात अनेक ठिकाणी अडचणी येत आहेत. मुंबईत नवाब मलिकांचा अडसर आहे. तर पुण्यात भाजपने अगोदरच स्वतंत्र बाणा जाहीर केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी राज्यातील अनेक महापालिकेत स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचे समोर येत आहे.
रात्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा
उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या रात्री जवळपास १ तास बैठक झाली.या बैठकीतील तपशील अजून समोर आला नाही.पण ज्या ज्या ठिकाणी युतीत लढणे शक्य आहे, अशा ठिकाणच्या जागांची चाचपणी करण्यासंबंधी चर्चा झाली असावा असा सूर समोर येत आहे.तर राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र लढण्याची भूमिका या बैठकीत मांडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या राष्ट्रवादीचे अजून एका मंत्र्याची विकेट पडली आहे. त्याचा कोणताही परिणाम येत्या निवडणुकीत होऊ नये यासाठी महायुतीतील घटक पक्ष ही राष्ट्रवादीसोबत जपून पावलं टाकत असल्याचे समोर येत आहे.
या पालिकेत एकला चलो रे चा नारा?
पुणे,पिंपरी-चिंचवड आणि अमरावती मनपा या महापालिका मधे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वतंत्र लढवण्याची तयारी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्वतंत्र लढण्याच्या संदर्भात पुढील काही दिवसात अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. महापालिकेत कुठे कुठे युती होणार याची घोषणा नगर परिषद निकालानंतर करण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजे याविषयीचा निर्णय 23 अथवा 24 डिसेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार?
राज्यातील इतर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्थानिक पातळींवर अनेक ठिकाणी भाजपा – शिवसेना सोबत प्राधान्याने युती करणार पण जिथ युती होत नाही तिथं स्थानिक पातळीवर शरद पवार एनसीपी आणि अन्य सोबत आघाडीची बोलणी करण्याचे संकेत बैठकीत एनसीपी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे एकत्रित निवडणूक लढवण्याची शक्यता वाढली आहे.