महेंद्र गोखले (फिटनेसविषयक प्रशिक्षक)
बनूया फिट
हे खरे आहे, की फिटनेस स्पर्धेत भाग घेणे प्रत्येकासाठी नसते. तथापि, तुम्ही तुम्हाला त्याचे कोणतेच फायदे दिसत नसल्याने फिटनेस स्पर्धांचा नकारात्मक विचार करत असाल, तर तुमचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.फिटनेस स्पर्धा म्हणजे केवळ विजय किंवा पराभव नव्हे, तर शिस्त, आत्मविश्वास आणि आरोग्य घडवणारा प्रवास आहे. या स्पर्धांमुळे शरीरासोबत मनही मजबूत होतं आणि आयुष्यभरासाठी निरोगी सवयी तयार होतात.
फिटनेसच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे फायदे असंख्य आहेत. स्पर्धा स्पर्धकाला भरपूर अनुभव आणि एक्सपोजर देते जे एखाद्याचे आयुष्य देखील बदलू शकते. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कमिटमेन्ट पाळावी लागते, काही गोष्टींचा त्याग करावा लागतो आणि या सगळ्यासाठी एक प्रकारची शिस्त आवश्यक आहे; परंतु स्पर्धेच्या शेवटी आपण जे काही मिळवतो ते आपल्या कठोर परिश्रमाचे फळ असतें.
आरोग्य सुधारते
ज्या क्षणी आपण फिटनेस स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेऊ, त्याच क्षणी आपण आपल्या आरोग्याला प्राधान्य द्यायला लागले पाहिजे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्याने आपल्या मनात एखादी महत्त्वाकांक्षाच निर्माण होते. ज्यामुळे आपण स्पर्धेचा गांभीर्याने विचार करायला लागतो. उदाहरणार्थ, आपल्याला खाण्याच्या सवयींवर लक्ष द्यावे लागेल. पौष्टिक अन्न घेतले नाही, तर स्पर्धेमध्ये टिकून राहणे शक्य होणार नाही.
फिटनेसच्या स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी आपल्याला पौष्टिक आहार घेणे; तसेच नियमित वर्कआउट आणि व्यायाम यामध्ये सक्रिय राहणे गरजेचे असते. या स्पर्धेसाठी शरीर पूर्णपणे तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपल्या दैनंदिन क्रियांमध्ये नियोजन आणि सातत्य राखावे लागेल, प्रशिक्षणाची सत्रे नियमितपणे पार करावी लागतील. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे व्यायाम आणि वेट ट्रेनिंगही आरोग्य दीर्घकाळापर्यंत उत्तम राखण्यासाठी मदत करतील.
कर्तृत्वाची भावना
फिटनेस स्पर्धेत भाग घेणे म्हणजे बकेट लिस्टमधील एक ध्येय साध्य करणे. स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी अनेक अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करणे आणि ती साध्य करणे आवश्यक आहे. आपण ट्रेनिंग आणि डाएट नियमितपणे राखू शकत नसलो, तर आपण कोणत्याही स्पर्धेत टिकू शकणार नाही, शरीर स्पर्धेसाठी तयार करू शकणार नाही.
आयुष्यात किमान एकदा तरी फिटनेस स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी मी लोकांना प्रोत्साहित करतो याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. यामुळे आपल्याला आपल्या फिटनेस संबंधी विविध आव्हानांना सामोरे जावे लागते- ज्याचा आपण इतर वेळी कधी विचारही करत नाही. अशा स्पर्धेच्या निमित्ताने आपण एक ध्येय निश्चित करतो, ते साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असतो. ते साध्य झाल्यावर आपल्यामध्ये पूर्णत्वाची भावना निर्माण होते आणि आत्मविश्वास वाढतो. अशा स्पर्धेसाठी शरीर तयार करताना सहनशीलता, सहिष्णुता आणि शिस्त असे जीवनात उपयोगी पडणारे गुण आपण आत्मसात करतो.
स्वत:चा शोध
‘स्वतःला सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न करा’ असे बऱ्याचदा म्हटले जाते; परंतु आपल्या क्षमतांची जाणीव ठेवून फिटनेस तयार करणे आणि स्पर्धेमध्ये बक्षीसास पात्र ठरणे हा प्रवास आपली स्वतःशीच नव्याने ओळख करून देतो. अशा प्रकारची स्पर्धा ही आळशी किंवा कमकुवत लोकांसाठी नक्कीच नाही. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी आपण स्वतः यासाठी सातत्यपूर्ण कठोर मेहनत आणि योग्य आहार यावर लक्ष केंद्रित करू शकणार आहोत याची खात्री करून घ्या.
फिटनेसची स्पर्धा हे आपल्याला आयुष्यभर उत्तम आरोग्य राखण्यासाठी मिळालेलं आव्हान आहे. यामध्ये शरीराचे; तसेच मनाचेही आरोग्य राखले जाईल याची काळजी घेतली जाते. वर्कआऊट करताना एखाद्या वेळेला आत्मविश्वास कमी पडू शकतो; मात्र तिथे भावनिकदृष्ट्या कणखर असणे गरजेचे असते. अशा परिस्थितीवर मात करून परत प्रयत्न करण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित करावे लागते. त्यामुळे अशा स्पर्धेतून स्वतःच्या शक्तीची आणि सामर्थ्याची आपल्याला नव्याने जाणीव होते आणि स्पर्धेनंतर समाधान वाटते.
नवीन लोकांची ओळख
स्पर्धेमुळे समविचारी लोकांची ओळख आणि मैत्री होऊ शकते. सहभागी खेळाडू वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून येतात आणि त्यामुळे प्रत्येक जण कसा विचार करतो आणि कशी तयारी करतो, याचीही माहिती मिळते. नवीन लोकांची ओळख आणि मैत्री होते आणि त्यातूनच व्यायाम करणे आणि दीर्घकालीन आरोग्य मिळवणे हे आनंददायी होऊ शकते. इतरांच्या उदाहरणाने आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतात. असं म्हणतात, की काही गोष्टी शिक्षकांनी शिकवण्यापेक्षा आपल्या वर्गमित्रांनी शिकवल्या तर त्या पटकन कळतात. नेमका हाच अनुभव तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतो.
आपण विजेते होऊ किंवा होणार नाही; परंतु या स्पर्धेचा प्रवास आपल्याला आयुष्यभराचा अनुभव आणि आनंद देऊन जाईल, याची मी स्वानुभवातून खात्री देतो. आपण जो अनुभव घेऊ, तो आपले आरोग्य आयुष्यभर उत्तम राखण्यासाठी महत्त्वाचा असेलच. या प्रवासानंतर कदाचित आपल्या दृष्टिकोनात फरक पडला असेल. इतरांसाठी प्रेरणा या स्पर्धेमध्ये आपण विजेते झालात किंवा आपली कामगिरी उत्तम झाली तर आपल्याबरोबरच्या सहस्पर्धकांसाठी आपण एक प्रेरणास्रोत होऊ शकता. आपल्याकडून इतर लोक काही गोष्टी शिकू शकतात, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब होऊ शकते. त्यामुळे फिटनेसची स्पर्धा ही स्पर्धा म्हणून न बघता एक आरोग्यदायी, आनंददायी आणि प्रेरणादायी अनुभव म्हणून बघावा आणि त्याचा आनंद उपभोगावा असा माझा स्वानुभवाचा सल्ला असेल.