टाकळी हाजी, ता. २८ : शिरूर तालुक्यातील बेट भागासाठी वरदान ठरलेल्या मीना शाखा कालव्याला त्वरित पाणी सोडण्यात यावे, अशी जोरदार मागणी शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
जुन्नर तालुक्यातील वडज धरणातून निघालेला मीना शाखा कालवा जुन्नर व आंबेगाव तालुक्यातून शिरूर तालुक्यात प्रवेश करतो. या कालव्याअंतर्गत काठापूर, पिंपरखेड, जांबुत, फाकटे, चांडोह, शरदवाडी, माळवाडी, म्हसे व डोंगरगण ही गावे येतात. सध्या या परिसरात कांदा लागवडीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून, त्यासाठी पाण्याची तीव्र कमतरता भासत आहे. अनेक शेतकऱ्यांनी घोड व कुकडी नद्यांवरून उपसा सिंचन योजनांद्वारे शेतीस पाणीपुरवठा केला आहे. मात्र, सध्या नदीपात्रातील पाणी कमी झाल्यामुळे या योजनांचे पाणी अपुरे पडत असून, कालव्याच्या पाण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
हा कालवा घोड व कुकडी या दोन्ही नद्यांच्या मधून जात असून, दोन्ही बाजूला कालव्याच्या पोटचाऱ्या काढण्यात आलेल्या आहेत. कालव्याला पाणी सोडल्यास दोन्ही नदीलगतचे मोठे क्षेत्र सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, मीना शाखा कालव्याला त्वरित पाणी सोडण्याबाबत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच माजी आमदार पोपटराव गावडे यांच्याकडे मागणी करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष जालिंदर डुकरे यांनी दिली.