लैंगिक छळ प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक.
Marathi January 12, 2026 01:26 PM

आणखी एका महिलेकडून बलात्काराचा आरोप

वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम

काँग्रेसचे केरळमधील पलक्कडचे आमदार राहुल ममकूटाथिल यांना रविवारी पहाटे पोलिसांनी अटक केली आहे. बलात्काराच्या तिसऱ्या गंभीर प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी ममकूटाथिल यांना पलक्कडच्या एका हॉटेलमधून ताब्यात घेतले, ज्यानंतर चौकशीसाठी त्यांना पथनमथिट्टा जिल्ह्यातील पोलीस स्थानकात आणले गेले. राहुल ममकूटाथिल विरोधात आता पथनमथिट्टा येथील एका महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार केली असून ती सध्या कॅनडात वास्तव्यास आहे.

महिलेने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वत:चा जबाब नोंदविला आहे. ममकूटाथिल यांनी विवाहाचे आश्वासन देत माझे लैंगिक शोषण केले होते. यातून मी गरोदर राहिले असता आमदाराने जबाबदारी स्वीकारण्यास नकार देत गर्भपात करविण्यासाठी धमकाविले होते. तसेच आमदाराने माझ्याकडून अनेकदा पैसेही उकळले होते अशी तक्रार संबंधित महिलेने केली आहे.

तर लैंगिक शोषणाच्या आणखी दोन प्रकरणांचा तपास करणाऱ्या एसआयटीलाच हे तिसरे प्रकरण सोपविण्यात आले आहे. एसआयटीचे नेत्त्व जी. पूंगुझाली करत आहेत. पोलिसांना यापूर्वी एक ध्वनिफित मिळाली होती, यात ममकूटाथिल हा एका महिलेला गर्भपात करविण्यासाठी धमकावत असल्याचे ऐकू येते. तर एका 23 वर्षीय युवतीने आमदारावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

काँग्रेसकडून निलंबन

आरोपांचे गांभीर्य पाहता काँग्रेसने राहुल ममकूटाथिल यांना पक्षातून निलंबित केले होते. ममकूटाथिल यांनी यापूर्वीच युवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या विरोधात अभिनेत्री ऋणी एन. जॉर्जने गैरवर्तनाचे आरोप केले होते. ममकूटाथिल यांना अटक झाल्याचे कळतच पलक्कडमधील माकप कार्यकर्त्यांनी मिठाईचे वाटप करत आनंद व्यक्त केला.

राजीनाम्याची वाढती मागणी

ममकूटाथिल यांच्या अटकेमुळे राज्यात एक मोठा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. काँग्रेस नेते ए. थंकप्पन यांनी ममकूटाथिल यांचे आता पक्षाशी कुठलेच देणेघेणे नसल्याचे म्हणत विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय त्यांचा वैयक्तिक असेल असे म्हटले आहे. तर काँग्रेस ममकूटाथिल यांना वाचवत असल्याचा आरोप भाजप नेते पी.के. कृष्णदास यांनी केला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.