पुणे - पदयात्रा, दुचाकी फेरीपासून ते प्रत्यक्ष घरभेटीवर भर देत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच उमेदवारांनी रविवारी केला. प्रचारातला आजचा रविवार हा शेवटचा असल्याने उमेदवारांच्या कुटुंबातील सदस्यांबरोबरच सर्व मित्रपरिवार एकाच वेळी रस्त्यावर उतरवल्याने सकाळपासून शहरात प्रचाराचा जोर वाढला होता. रिक्षांवरील भोग्यांचा कलकलाट, घोषणाबाजीने शहर दणाणून गेल्याने शेवटचा रविवार प्रचाराच्या आवाजाने गाजला.
निवडणुकीतील गेल्या आठवडा पक्षांच्या जाहीरमान्यांबरोबरच आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. मंगळवारी (ता. १३) प्रचाराची सांगता होत आहे. त्यामुळे प्रचारासाठी अवघे दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे.
प्रभागांतील मतदारांची संख्या विचारात घेता प्रत्येक मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरू आहे. त्यात रविवार सुट्टीचा दिवस असल्याने कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र भेटीची संधी आल्याने उमेदवारांनी त्याचा फायदा घेतला नाही तर नवलच. त्यामुळे सकाळपासून उमेदवारांनी प्रचारासाठी सर्व ताकद पणाला लावल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळाले.
परिणामी दुचाकी फेरी आणि पदयात्रांमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. गर्दी असणाऱ्या मटणांच्या दुकानावर, मच्छी बाजारात, भाजी-मंडईसारख्या ठिकाणी टोप्या, गळ्यात मफलर, हातात झेंडे घेतलेल्या कार्यकर्त्यांना घेऊन भेट देत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केला. प्रमुख राजकीय पक्षांबरोबर रिंगणात उरलेल्या अपक्षांनीदेखील रविवारचे निमित्त साधत संधीचे सोने करून घेतले.
राजकीय वातावरण निघाले ढवळून
उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या एकापाठोपाठ धावणाऱ्या रिक्षा, काही अंतराच्या फरकाने चौकाचौकांत उभे केलेले एलईडी रथ, मुख्य रस्त्यांबरोबरच गल्लीबोळातून धावणाऱ्या दुचाकी फेरीने शहरातील वातावरण उमेदवारांनी ढवळून काढले.
पत्नी, मुलगा, भाऊ असे सर्वच कुटुंबातील सदस्यांबरोबरच मित्र परिवार, नातेवाईक प्रचारात उतरविले. लाडक्या उमेदवारांच्या विजयासाठी गटागटाने सोसायट्यांमध्ये प्रचारासाठी फिरत असल्याचे चित्र उपनगरात दिसत होते.
मतदानाबाबत प्रात्यक्षिके
१) यंदा प्रभाग पद्धतीने निवडणूक होत आहे
२) एकाच प्रभागात चार उमेदवार असणार
३) त्यामुळे मतदान कसे करावयाचे, याबाबत मतदारांमध्ये गोंधळ आहे
४) उमेदवारांनी गृहभेटीत प्रात्यक्षिक दाखवून मतदानाबाबत मार्गदर्शन केले
५) त्यासाठी मतदान यंत्राची प्रतिकृती बरोबर घेऊन मतदारराजाला समजावून सांगण्यात येत होते
६) विशेषतः ज्येष्ठांना मतदान यंत्राची प्रतिकृती दाखवून त्यांच्याकडून मतदान कसे करायचे, आपल्या उमेदवाराचा अनुक्रमांक काय आहे, चिन्ह काय आहे, यांची प्रात्याक्षिके घरोघर जाऊन कार्यकर्त्यांकडून दाखविली जात होती.
सभेपेक्षा उमेदवारांचा प्रत्यक्ष भेटींवर भर
प्रचारासाठी मिळालेला कमी कालावधी यामुळे सभांपेक्षा पदयात्रा, रॅलीच्या माध्यमातून यंदा प्रचारावर अधिक भर दिला. मात्र भाजपच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘संवाद पुणेकरांसाठी’च्या माध्यमातून पाच लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी तीन सभा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. हे दोन पक्ष सोडले, तर अन्य प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला. त्यामुळे उमेदवारांचा रविवार हा ‘फूल टू प्रचारा’तच गेला.