तात्या लांडगे
सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सव्वादोन कोटी महिलांना मकर संक्रातीपूर्वी डिसेंबर व जानेवारी, अशा दोन महिन्यांचे तीन हजार रुपये वितरित करण्याचे नियोजन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने सहा हजार ७०० कोटींचा निधी वित्त विभागाकडे मागितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेली लाडकी बहीण योजना जुनी आहे. योजनेच्या शासन निर्णयानुसार दरमहा १० तारखेपर्यंत लाभ वितरित होईल, असे नमूद आहे. त्यामुळे सध्या महापालिका निवडणूक सुरू असून १५ जानेवारीला मतदान आहे. पण, ही योजना जुनी असून शासन निर्णयानुसार योजनेचा लाभ वितरित करण्यास कोणतीही अडचण नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.
नगरपालिका निवडणुकीवेळी आचारसंहिता जाहीर झाल्याच्या दिवशी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाभार्थींच्या खात्यात जमा झाला होता. नोव्हेंबर महिन्यांचा हप्ता देखील महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाच १५ दिवसांपूर्वी जमा झाला आहे. दरम्यान, आता काँग्रेसने मतदानापूर्वी वितरित होणाऱ्या लाडक्या बहिणींच्या लाभासंदर्भात निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यावर आता राज्य निवडणूक आयोग काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
‘बालसंगोपन’साठी १०० कोटीची मागणी
अनाथ किंवा एक पालक नसलेल्या मुलांना १८ वर्षांपर्यंत शासनाकडून दरमहा २२५० रुपये दिले जातात. त्यांना देखील दोन महिन्यांपासून लाभ मिळालेला नाही. लाडक्या बहिणींसमवेत आता या लाभार्थींनाही प्रलंबित लाभ वितरित केला जाणार आहे. त्यासाठी महिला व बालविकास विभागाने वित्त विभागाकडे १०० कोटींची पुरवणी मागणी पाठविली आहे.
योजनेचा लाभ थांबविता येणार नाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील एकूण लाभार्थींमध्ये सुमारे ९३ लाख लाभार्थी महिला शहरांमधील आणि दीड कोटी लाभार्थी ग्रामीण भागातील आहेत. सध्या ग्रामीण भागात कोणतीही आचारसंहिता नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थींसह जुन्या शासकीय योजनेचा दरमहा वितरित होणारा लाभ थांबविता येणार नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.
लाडकी बहीण योजनेची स्थिती
एकूण लाभार्थी
२.२३ कोटी
शहरी भागातील महिला
अंदाजे ९३ लाख
दोन महिन्यांसाठी अपेक्षित निधी
६,६९० कोटी