WPL 2026: 4,4,6,6,6,6... सोफी डिवाईनचं वादळ घोंगावलं, पण नंतर नंदिनी शर्माने हॅट्रिक घेत लक्ष वेधलं; पाहा Video
esakal January 12, 2026 01:45 PM

वूमन्स प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (WPL) रविवारी (११ जानेवारी) गुजरात जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४ धावांनी रोमांचक विजय मिळवला. हा सामना अत्यंत थरारक तर ठरलाच, पण त्याबरोबरच या सामन्यात गुजरातच्या सोफी डिवाईनने (Sophie Devine), तर दिल्लीच्या नंदिनी शर्माने (Nandani Sharma) विक्रमी कामगिरी केली.

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव सोफी डिवाईनची वादळी खेळी

या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी केली, यावेळी गुजरातकडून सलामीला फलंदाजीला उतरलेल्या सोफी डिवाईनने वादळी खेळ केला. तिला दुसऱ्या बाजूने बेथ मुनीने साथ दिली. यावेळी सोफीने पॉवरप्लेमध्ये प्रचंड वेगात धावा केल्या. तिने पॉवर प्लेच्या अखेच्या म्हणजेच ६ व्या षटकात मोठे शॉट्स खेळले.

दिल्लीकडून या षटकात स्नेह राणाने गोलंदाजी केली होती. पण सोफिने या षटकात पहिल्या दोन चेंडूवर चौकार मारले. तसेच नंतरच्या ४ चेंडूंवर सलग चार षटकार मारले. त्यामुळे एकाच षटकात तिने ३२ धावा चोपल्या.

सोफी WPL मध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. तसेच स्नेह राणा एकाच षटकात सर्वाधिक धावा खर्च करणारी गोलंदाज ठरली. तिने दीप्ती शर्माला मागे टाकले. दीप्तीने २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध लखनौमध्ये एकाच षटकात २८ धावा खर्च केल्या होत्या.

दरम्यान सोफीनेच्या खेळामुळे गुजरातने ६ षटकात ८८ धावा केल्या होत्या. मात्र बेथ मुनी १९ धावांवर बाद झाल्यानंतर सोफीही ४२ चेंडूत ९५ धावा करून बाद झाली. तिने ७ चौकार आणि ८ षटकार मारले. WPL मध्ये एकाच डावात सर्वाधिक ८ षटकार दोनदा मारणारी सोफी पहिली खेळाडूआहे. यापूर्वी २०२३ मध्ये तिने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी गुजरात जायंट्सविरुद्ध ८ षटकार मारले होते.

MI vs DC WPL 2026 : हरमनप्रीत कौर, नॅट शिव्हर ब्रंटची जबरदस्त खेळी; मुंबई इंडियन्सने मारली बाजी, दिल्ली कॅपिटल्सची झाली हार नंदिनीची हॅट्रिक

सोफी बाद झाल्यानंतर केवळ कर्णधार ऍश्ले गार्डनरने ४९ धावांची खेळी केली. पण नंतर दिल्लीच्या गोलंदाजांनी गुजरातच्या फलंदाजांना संघर्ष करायला लावला. त्यातच नंदिनी शर्माने शेवटच्या षटकात हॅट्रिकसह ४ विकेट्स घेतल्या. तिने या षटकात दुसऱ्या चेंडूवर काशवी गौतमला १४ धावांवर बाद केल.

त्यानंतर तिने चौथ्या चेंडूवर कनिका आहुजाला १ धावेवर, त्यानंत राजेश्वरी गायवाड आणि रेणुका सिंग ठाकूर यांनी पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर त्रिफळाचीत केले. यासह तिने गुजरातचा डाव २०९ धावांवर संपवण्यासोबतच हॅट्रिक साजरी केली. ती हॅट्रिक घेणारी चौथी खेळाडू ठरली. यापूर्वी WPL मध्ये इजी वाँग (२०२३), दीप्ती शर्मा (२०२४) आणि ग्रेस हॅरिस (२०२५) यांनी हॅट्रिक घेतली आहे.

दिल्लीचा पराभव

दरम्यान, २१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीकडून लिझेल लीने ५४ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. तसेच लॉरा वुल्फार्टने ३८ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. दिल्लीला शेवटच्या दोन चेंडूत ५ धावांची गरज असताना वुल्फार्ट बाद झाली. या दोघींशिवाय दिल्लीकडून कोणाला फारशी खास खेळी करता आली नाही. अखेर दिल्लीला २० षटकात ५ बाद २०५ धावांच करता आल्या.

गुजरातकडून सोफी डिवाईनने शेवटच्या षटकात गोलंदाजी करताना ७ धावांचे रक्षणही केले. तिने जेमिमाह रोड्रिग्स आणि वुल्फार्ट यांना बाद केले. गुजरातकडून तिच्याशिवाय राजेश्वरी गायकवाडनेही २ विकेट्स घेतल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.