उपक्रमशील शाळा
खळद, ता. १५ : खळद (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक पीएमश्री (प्राइम मिनिस्टर स्कूल फॉर रायझिंग इंडिया) या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, अत्याधुनिक सुविधांच्या माध्यमातून ‘पीएमश्री उपक्रमशील शाळा’ हा नावलौकिक तयार केला आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेची एकमेव पीएमश्री योजनेतील शाळा आहे. गावाच्या परिसरात इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत आता याच शाळेतून पुन्हा विद्यार्थी मराठी शाळेत प्रवेश घेत आहेत.
पीएमश्री योजनेच्या व ग्रामपंचायत खळद यांच्या वतीने प्रयत्नाने शाळेच्या आवारामध्ये विद्यार्थ्यांसाठी खेळणी, पिण्याचे पाणी व हॅण्ड वॉश स्टेशन, सुसज्ज लॉन, बंदिस्त परसबाग, आकर्षक पेव्हर ब्लॉक, शैक्षणिक व्हरांडा, रॅम्प, सुसज्ज स्टेज, शालेय इमारतीची उत्तम पद्धतीची रंगरंगोटी, विद्यार्थी स्वच्छतागृह, शिक्षक स्वच्छतागृह, सीसीटीव्ही कॅमेरे, शैक्षणिक सॉफ्टवेअर असणाऱ्या वर्गनिहाय स्क्रीन, इंटरनेट वाय-फाय सुविधा, संगणक व अत्याधुनिक प्रिंटर, योगा मॅट प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी, संगीत साहित्य, डायनिंग टेबल, शालेय इन्स्टाग्राम पेज, यु- ट्यूब चॅनेल व ब्लॉग या सुविधा शाळेमध्ये उपलब्ध केल्या आहेत. या सुविधांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे.
शैक्षणिक वर्षात विविध कार्यशाळा, दुसरी, तिसरीसाठी मंथन प्रज्ञाशोध व चौथीसाठी स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेची तयारी, यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा, संविधान दिन, विविध जयंती व पुण्यतिथी साजरी करणे, वाचन प्रेरणा दिन, वक्तृत्व स्पर्धा व हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, लेझीम,कवायत, योगासने, परेड यांची प्रात्यक्षिके आदी उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना चालना देण्याचे काम शाळेमार्फत केले जाते.
ई लर्निंग अध्ययन - अध्यापनवर्ग, योगा शिक्षक व संगीत शिक्षक नेमून त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा तयारीसाठी आॅनलाइन क्लास मधून अधिकचे दैनिक मार्गदर्शन, प्रिंटरच्या माध्यमातून साप्ताहिक कृतीपत्रिका व प्रश्नपत्रिका यांचा सराव, इंटरनेट व एआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जगाशी कनेक्ट केले जाते व शैक्षणिक अडथळे दूर केले जातात, शाळेच्या वेळेनंतर सुद्धा विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पीएमश्री विद्यार्थी हेल्पलाइन अँड कनेक्ट विथ व्हॉट्सॲप, बालसाहित्य लेखनातून बाल लेखकांची निर्मिती या सर्व उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपली बौद्धिकता, कलात्मकता व सृजनशीलता वाढवण्यासाठी मदत होत आहे.
ग्रामपंचायत व लोकसहभागातून शालेय रंगरंगोटी व हॅन्ड वॉश स्टेशन, अत्याधुनिक प्रिंटर, स्कॅनिंग व झेरॉक्स मशिन शाळेला देण्यात आले आहे. विविध कृतीपत्रिका व प्रश्नपत्रिका छपाईसाठी लागणारे कागद खर्चाची जबाबदारी पालकांनी घेतली आहे. अक्षरसृष्टी संस्था यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप ई. भरीव कामे लोकसहभागातून झाली आहेत.
खळद शाळेतील विद्यार्थिनी आर्वी विजय कादबाने चौथी, शिवण्या अभिजित कामथे चौथी, ज्ञानेश्वरी शिवाजी कामथे तिसरी, शिवण्या विश्वनाथ रासकर तिसरी यांचे लेख विविध मासिक व वर्तमानपत्रामधून छापून आले आहेत. दरवर्षी मंथन प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये सहभागी होऊन केंद्रपातळीवरील गुणवत्ता यादीमध्ये चमकतात. यशवंतराव चव्हाण कला, क्रिडा स्पर्धांमध्ये लेझीम, लोकनृत्य, लंगडी, वेशभूषा, लंगडी, खो-खो या स्पर्धांमध्ये तालुका पातळीवर व केंद्रपातळीवर विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
* शाळेतील उपक्रम :
- वाचन - लेखन विकास
- मंथन प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा
- स्कॉलरशिप स्पर्धापरीक्षा
- लेझीम, कवायत, नृत्य,क्रीडा विकास
- बालसाहित्य लेखन विकास
- संगणक व तंत्रज्ञान शिक्षण
- इंग्रजी भाषा विकास
- डिजिटल हजेरी
- सहल व क्षेत्र भेट
- स्पेलिंग पाठांतर व पाढे पाठांतर
- कविता गायन स्पर्धा
- आनंददायी शनिवार
आधुनिक सुविधा :
* शाळेत १ ली ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना डिजिटल स्क्रीन च्या माध्यमातून शिक्षण दिले जाते.
* शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रिंटेड कृतीपत्रिका व स्पर्धा परीक्षा सराव साहित्य मोफत छापून दिले जाते.
* प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गतीनूसार शिक्षण व वैयक्तिक मार्गदर्शन
* पीएमश्री विद्यार्थी हेल्पलाइन व कनेक्ट विथ व्हॉट्सॲप योजना
* डॉ. जयंत नारळीकर गणित - विज्ञान समृद्धी कार्यक्रम व मराठी खान ॲकॅडमी माध्यमातून ऑनलाइन पोर्टल वर २ री ते ४ थी ₹ च्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र लॉगिन
* योगा शिक्षक व संगीत शिक्षक यांची नेमणूक करून योग व संगीताचे मार्गदर्शन
* पीएमश्री योजनेतून मोफत सहल व क्षेत्र भेट
* इंटरनेट व AI च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन व सराव.
* पीएमश्री योजनेतून बालवाटिका अर्थात अंगणवाडी सक्षमीकरण कार्यक्रम
* सीसीटीव्ही यंत्रनेच्यामाध्यमातून विद्यार्थी सुरक्षा
पुरस्कार
* संदीप संपत लव्हे - पंचायत समिती पुरंदर आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०२३-२०२४
* माया वसंतराव ताकवले - पंचायत समिती पुरंदर आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०१३-१४
यशामागचे शिल्पकार :
या यशामागे मुख्याध्यापिका माया ताकवले, तंत्रस्नेही शिक्षक संदीप लव्हे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. वेळोवेळी केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी व गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चेतन कामथे व त्यांचे सहकारी, पालक, विद्यार्थी, ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचे शाळा विकासात मोलाचे योगदान आहे.