CM Devendra Fadnavis: माझ्या बोटावरची शाई पुसत नाही, राज ठाकरेंच्या आरोपावर CM फडणवीसांचे उत्तर
Saam TV January 16, 2026 01:45 PM
Summary -
  • मतदानातील शाई पुसली जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेवर सवाल उपस्थित केला

  • मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोप फेटाळत निवडणूक आयोगावर विश्वास व्यक्त केला

  • मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना भरघोस मतदानाचे आवाहन केले

मुंबई महानगर पालिका निवडणुकीत मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटावर लावण्यात आलेली शाई पुसली जात असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मतदारांच्या बोटावर मार्करने खूण केली जात आहे. पण काही वेळात ही शाई पुसली जात आहे. यासंदर्भातले अनेक व्हिडीओ देखील समोर आले आहेत. सोशल मीडियावर शाई पुसली जात असल्याचे व्हिडीओ पोस्ट करत नागरिक संताप व्यक्त करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील शाई पुसली जात असल्याचा आरोप केला आहे. विरोधकांच्या शाई पुसली जात असल्याच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 'माझ्या बोटावरील शाई पुसली जात नाही', असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.

राज ठाकरे यांनी 'मतदानावेळी शाईऐवजी पेनाने बोटावर खूण केली जात आहे. सॅनिटायझरने ती शाई पुसली जात आहे.', असे विधान केले. राज ठाकरे यांच्या या विधानावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत 'माझ्या बोटावरही मार्करची शाई लावली आहे. मात्र ती पुसत नाही.', असे सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मी मतदान केलं आहे आणि सर्वांनी मतदान करा असे आवाहन केले.

Mahapalika Election : ...तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती, प्राजक्ता माळीनं केलं आवाहन | Video

मुख्यमंत्र्यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रश्नावर उत्तर दिलं. 'पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ठरवतात या आधी सुद्धा अनेक वेळा मार्कर वापरण्यात आला होता. जर कोणाचा आक्षेप असेल तर निवडणूक आयोगाने त्याकडे लक्ष द्यावं. मला देखील मार्कर लावण्यात आला आहे. पण माझ्या हातावरील शाई निघत नाही. असं आहे की कुणाचं यावर आक्षेप असेल. निवडणूक आयोगाने यामध्ये लक्ष दिले पाहिजे. आणखी काही वापरायचे असेल तरी वापरा. ऑइलपेंट वापरायचे असेल तरी चालेल पण निवडणूक निपक्ष झाली पाहिजे. अशाप्रकारे प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेत आपल्या लोकतांत्रिक संस्था आहे त्यांच्यावर एकप्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे चुकीचे आहे.', असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

Municipal Election : भाजपच्या पोलिंग एजंटकडून आचारसंहितेचा भंग, मीरा रोडमध्ये सकाळी नेमकं काय झालं?

तसंच, 'स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा पायवा आहे. लोकशाही सुदृढ करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे. मी नेहमी असं म्हणतो की मतदान हा अधिकार नाही तर ते आपलं कर्तव्य सुद्धा आहे. मतदान न करणे याचा अर्थ लोकशाहीमध्ये कर्तव्याचे पालन न करण्यासारखे आहे. म्हणून मी मतदान केलं आहे आणि मी सर्वांना विनंती करतो सगळ्यांनी भरघोस मतदान करावं. चांगलं मतदान झालं तर चांगली लोक निवडून येतात. मी महाराष्ट्रातील २९ ही महानगरपालिकेतील जनतेला आवाहन करतो की भरगोस मतदान करावं.', असे मुख्यमंत्री म्हणाले.

Navi Mumbai Election : मतदानाच्या काही तास आधीच नेरूळमध्ये अडीच लाखांची रोकड पकडली; मतदार यादी झेरॉक्स, कागदपत्रे जप्त
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.