swt1520.jpg
17943
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद
swt1521.jpg
O17944
नारायण राणे
सिंधुदुर्गात महायुती होणार?
आज शिक्कामोर्तबः निवडणुकीची सगळी सुत्रे पुन्हा नारायण राणेंकडे
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः सिंधुदुर्गात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुती होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. महायुतीची सुत्रे पुन्हा एकदा खासदार नारायण राणे यांच्याकडे असणार आहेत. या सगळ्यावर उद्या (ता. १६) शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि आठही पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५० तर आठही पंचायत समित्यांच्या मिळून १०० जागांसाठी ही चुरस असणार आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीतील सर्व घटक पक्ष स्वतंत्र लढले होते. शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट लढत झाली होती. एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांमुळे ही लढत राज्यात लक्षवेधी ठरली होती; मात्र या निवडणुकीआधी खासदार राणे यांनी महायुतीचा आग्रह धरला होता. त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले नव्हते. प्रचारात एकमेकांच्या विरोधात झालेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे महायुतीतील घटकपक्षांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषदेच्या लढती होत आहेत.
शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्याकडे जवळपास सगळ्याच मतदारसंघात प्रबळ इच्छूकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे महायुती झाल्यास तिकीट वाटप करणे सोपे राहणार नाही. या सगळ्याचा विचार करता महायुतीबाबतचा संभ्रम आणखी वाढला होता; मात्र दोन्ही पक्षाच्या वरिष्ठस्तरावरून महायुती म्हणूनच या निवडणुका लढण्याचा आदेश आल्याचे समजते. पालिकेच्या निवडणुकीत खासदार राणे प्रचारात उतरले नव्हते. महायुती न होणे त्यांना रुचले नसल्याचे वेळोवेळी पुढे आले होते. आता मात्र महायुतीची सगळी सुत्रे खासदार राणे यांच्याकडे जाणार आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उद्या दोन महत्त्वपूर्ण बैठका होणार आहेत. याच्या अध्यक्षस्थानी खासदार राणे असणार आहे. यात महायुती करण्यावर शिक्कामोर्तब तसेच जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर निर्णय होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षातील राज्यस्तरावरील वरिष्ठ नेते सिंधुदुर्गातील निर्णयावर हस्तक्षेप करणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे. यामुळे अंतिम निर्णय खासदार राणे यांच्याकडे असणार आहे.
चौकट
उमेदवार निवडीचे राणेंना अधिकार?
महायुती झाल्यास बंडखोरी होण्याची शक्यता जास्त आहे. कारण जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांसाठीच्या जवळपास सगळ्या जागांसाठी दोन्ही पक्षांकडे दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रबळ इच्छूक आहेत. काही भागात तर ही संख्या ७ ते ८ पर्यंत आहे. त्यामुळे उमेदवार ठरवणे सोपे असणार नाही. या पार्श्वभूमीवर उमेदवार निवडीचे सर्व अधिकार खासदार राणे यांना दिल्याचे समजते.
चौकट
‘महाविकास’च्या भुमिकेकडे लक्ष
महाविकास आघाडी होणार की घटक पक्ष वेगवेगळे लढणार याबाबतच्या फारशा हालचाली सुरू झालेल्या नाहीत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे फारसे प्राबल्य राहिलेले नाही. काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना यांच्यातच एकत्र येवून लढणार की स्वतंत्र हा निर्णय होणार आहे. महायुती झाल्यास काही पर्यायाच्या शोधातील नाराज इतर पक्षांकडे वळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी झाल्यास त्यांच्यासाठी पर्याय खुला होणार आहे. शिवाय महायुतीसमोर आव्हानही उभे करण्याची संधी महाविकाससमोर असणार आहे; मात्र मोर्चेबांधणीच्या पातळीवर महायुतीच्या तुलनेत त्यांच्याकडून हालचालींना वेग आला नसल्याचे चित्र आहे.