चिमुकल्या जीवाला मायेची ''ऊर्जा''
esakal January 16, 2026 01:45 PM

swt1513.jpg
17964
सावंतवाडी ः येथील शासकीय अंकुर महिला वसतिगृहात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत नामकरण सोहळा पार पडला. यावेळी विविध अधिकारी उपस्थित होते.

चिमुकल्या जीवाला मायेची ‘ऊर्जा’
अंकुर केंद्रात नामकरण ः निराधार मातेसह तिच्या बाळाला आधार
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १५ ः जगात सर्व काही हरवल्यासारखे वाटत असतानाही माणुसकीचा एक हात पुढे आला, तर आयुष्याला पुन्हा अर्थ मिळतो, याची जिवंत साक्ष सावंतवाडी येथील शासकीय अंकुर महिला वसतिगृहात पाहायला मिळाली. मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी, समाजाने पाठ फिरवलेल्या एका निराधार मातेला आणि तिच्या नवजात बालिकेला केवळ निवारा नव्हे, तर मायेची सावली, ओळख आणि उज्ज्वल भविष्याची आशा मिळाली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या नामकरण सोहळ्यात त्या चिमुकल्या जीवाला ‘ऊर्जा’ हे अर्थपूर्ण नाव देण्यात आले. ७० वर्षांच्या इतिहासात प्रथमच अंकुर महिला वसतिगृहात असा भावनाप्रधान नामकरण सोहळा साजरा झाला.
गर्भावस्थेत असताना पतीने वाऱ्यावर सोडलेल्या या पीडित महिलेसाठी आयुष्य म्हणजे अंधार होता. आधार नाही, घर नाही, भविष्याचा ठावठिकाणा नाही, अशा अवस्थेत तिने अंकुर वसतिगृहात आश्रय घेतला. त्या काळजीतून, प्रेमातून आणि मायेच्या वातावरणातून जन्माला आली ती ‘ऊर्जा’. प्रशासनाने तिला केवळ कायदेशीर संरक्षण दिले नाही, तर एका कुटुंबासारखी साथ देत तिच्या आयुष्याला नवे वळण दिले. ‘रंजले-गांजले यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले, तर तोच खरा विकास,’ असे भावनिक उद्गार जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी यावेळी काढले. त्यांच्या शब्दांतून प्रशासनातील संवेदनशीलतेचे दर्शन घडले.
नामकरणाच्या वेळी पाळणा गीतांच्या सुरांनी संपूर्ण परिसर भारावून गेला. बालिकेची माता, वसतिगृहातील महिला आणि उपस्थित अधिकारी अश्रूंनी डोळे भरून उभे होते. हा क्षण केवळ एका नावाचा नव्हता, तर माणुसकी जिवंत असल्याचा, समाज अजूनही संवेदनशील आहे याचा ठाम संदेश देणारा होता. ’ऊर्जा’ हे नाव जसे बालिकेच्या आयुष्याला बळ देणारे आहे, तसेच ते समाजासाठीही प्रेरणादायी ठरले. निराशेच्या गर्तेत असलेल्या अनेक महिलांसाठी हा सोहळा आशेचा दीप बनून उजळून निघाला. या प्रसंगी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे, पोलीस निरीक्षक माधुरी मुळीक, अभियंता पूजा इंगवले, जिल्हा परिविक्षा अधिकारी भिकाजी काटकर, प्रभारी अधिक्षिका लक्ष्मी जांभोरे, विधी सल्लागार श्रीनिधी देशपांडे, जिल्हा संरक्षण अधिकारी राजगोविंद मडावी, बाल कल्याण समिती व बाल न्याय मंडळाच्या सदस्या, वन स्टॉप सखी केंद्र, महिला समुपदेशन केंद्र तसेच अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत या चिमुकल्या ‘ऊर्जा’साठी शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले.

चौकट
माहेरपणाची ऊब
अंकुर महिला वसतिगृहाने या महिलेस निवाऱ्यापलीकडे जाऊन माहेरपणाची ऊब दिली. गर्भावस्थेपासून प्रसूतीपर्यंत तिची वैद्यकीय, मानसिक व सामाजिक काळजी घेतली गेली. २३ डिसेंबरला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तिला कन्यारत्न प्राप्त झाले. ही आनंदवार्ता कळताच जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी ‘मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमांतर्गत संस्थेतच नामकरण सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला, जो समाजासाठी प्रेरणादायी ठरला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.