निरगुडसर, ता. १५ ः मंचर- रांजणी (ता. आंबेगाव) रस्त्यावरील प्रवास असंख्य खड्ड्यांमुळे धोकादायक बनला आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे चुकविण्याच्या नादात अपघाताला सामोरे जाण्याच्या घटना घडल्या आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशा मागणीचे निवेदन नीती पुणे जिल्हा अध्यक्ष ग्राहक पंचायत नितीन मिंडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिले आहे.
मंचर- बेल्हे हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या रस्त्यावरील मंचर- पिंपळगाव फाटा ते रांजणी दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत असून, प्रवास धोकादायक बनला आहे. याशिवाय मंचर, पिंपळगाव फाट्यापासून कॉक्रिटीकरणाचा रस्ता संपताच खड्ड्यांना सुरुवात होते. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच, चांडोली, बेलदत्त फाटा, खडकी फाटा, थोरांदळे, रांजणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मंचर ते रांजणी या दरम्यान २० ते २५ प्रतिरोधक टाकण्यात आले आहेत आणि त्याची उंची ही तुलनेने जास्त असल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मंचर- रांजणी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. वार्षिक दुरुस्ती निधी अंतर्गत या महिना अखेर हे काम पूर्ण करून प्रवाशांचा प्रवास सुलभ होणार आहे.
- रवी मजकुरी, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
प्रवाशांना मनस्ताप
या मार्गावरून विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. त्यामुळे सर्वांना या खड्ड्यांचा मोठा त्रास होत आहे. या कारणामुळे प्रवाशांना रस्त्यावर प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून केली जात आहे.
03096