swt153.jpg
17971
रांगणागड ः गिअर अप जिमतर्फे आयोजित रांगणागड ट्रेकमध्ये सहभागी झालेले गडप्रेमी. (छायाचित्र ः अजय सावंत)
‘गिअर अप’च्या मावळ्यांकडून रांगणा ‘सर’
ट्रेकला उत्स्फूर्त प्रतिसाद; लाठीकाठी प्रात्यक्षिकांसह स्वच्छत मोहीम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १५ ः गिअर अप जिमचे संचालक साईराज जाधव यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (ता. ११) रांगणा गड ट्रेकचे आयोजन करण्यात आले. या ट्रेकसाठी जिममधील व जिम व्यतिरिक्त असे ८० गडप्रेमींनी सहभागी घेतला. यावेळी गडावर साहसी उपक्रमांतर्गत स्वसंरक्षणसाठी लाठीकाठीसह दानपट्ट्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. सलग आठ वर्षे हा उपक्रम राबवून गडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या ट्रेकची सुरुवात जिमचे ज्येष्ठ सदस्य डॉ. सूरज शुक्ला, डॉ. सुविधा वाळवे, डॉ. पूजा गावडे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वराज्य संस्थापक, मराठाधीश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या ट्रेकसाठी योगदान देणाऱ्या व ट्रेकमध्ये सहभागी झालेल्या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मनीषा पोरे, कविता शेळके, दिव्या गावडे यांचा समावेश होता. न्यू लाईफ फिजिओथेरपी सेंटरचे डॉ. सूरज शुक्ला, गेली सात वर्षे या ट्रेकच्या निमित्ताने जेवण व नाश्ताची सोय करणारे अमित सरनोबत, एकनाथ सरनोबत, ट्रेकमध्ये सहभागी झालेला सर्वात छोटा तीन वर्षीय पद्मनाभ पाटकर यांचा साईराज जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ट्रेकला सकाळी ८.२० ला सुरुवात झाली व १० वाजता गडावर पोहोचली. गडाच्या मुख्य दरवाजाजवळ कविता शेळके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. किशोर सरनोबत यांनी गडाची इत्थंभूत माहिती दिली. त्यांनी शिवाजी महाराजांवर सादर केलेली कविता सर्वांना भावली. ज्ञानेश्वर आळवे यांनी लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर केले. दुपारी १२.३० वाजता परतीचा प्रवास सुरू झाला व २ वाजता टीम सरनोबत यांच्या निवासस्थानी आली. तेथे सहभोजनाचा आस्वाद घेतला. सर्व सहभागींना जिमचे संचालक हेमंत जाधव व साईराज जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. ट्रेक यशस्वी करण्यासाठी जिमचे ट्रेनर पंकज गावडे, दर्शन मयेकर, मनीष घाडी, डॉ. सूरज शुक्ला, जिमचे सदस्य विशाल कदम, ऋषिकेश महाजन, ज्ञानेश्वर आळवे, अदनान करोल, रुद्रराज कुडाळकर यांचे सहकार्य लाभले.