swt1410.jpg
17776
तुळस ः अश्वमेध महोत्सवाचे उद्घाटन करताना दिलीप गिरप. बाजूला बाळू देसाई व इतर मान्यवर.
‘वेताळ’च्या उपक्रमांना सर्वोच्च प्राधान्य
दिलीप गिरप ः तुळसमध्ये ‘अश्वमेध’ महोत्सव उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १५ ः विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्याचे कार्य अशा महोत्सवांतून घडते. वेताळ प्रतिष्ठानसारख्या संस्थांचे हे कार्य कौतुकास्पद असून भविष्यातही अशा उपक्रमांना नगरपरिषदेचे सहकार्य राहील, असे प्रतिपादन वेंगुर्लेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी तुळस येथे अश्वमेध महोत्सवात केले.
तुळस येथे आयोजित अश्वमेध महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या शालेय सांस्कृतिक स्पर्धांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माध्यमिक व प्राथमिक गट अशा दोन विभागांत झालेल्या या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कला, बुद्धिमत्ता व सादरीकरण कौशल्याचे प्रभावी दर्शन घडले.
या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व नगराध्यक्ष गिरप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई उपस्थित होते. याप्रसंगी वेंगुर्ले नगरपरिषदेतून निवडून आलेल्या अॅड. सुषमा खानोलकर, शीतल आंगचेकर, रिया केरकर, लीना म्हापणकर, गौरी माईणकर, गौरी मराठे, आकांक्षा परब, सदानंद गिरप, रवींद्र शिरसाट, प्रणव वायंगणकर, प्रीतम सावंत व सचिन शेट्ये आदी नगरसेवकांचा वेताळ प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला.
मनीष दळवी यांनी, शालेय जीवनात मिळणाऱ्या अशा सांस्कृतिक संधी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. कला, संस्कृती आणि स्पर्धात्मकता यांचा समन्वय साधणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरतात, असे सांगितले.
स्पर्धेचा निकाल असा ः समूहगीत गायन स्पर्धा (मोठा गट)-पंचक्रोशी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे, श्री शिवाजी हायस्कूल तुळस, जनता विद्यालय तळवडे. प्रश्नमंजुषा स्पर्धा (मोठा गट)-जनता विद्यालय तळवडे, पंचक्रोशी विद्यालय नेमळे, श्री शिवाजी हायस्कूल तुळस. समूह नृत्य स्पर्धा (मोठा गट)-श्री शिवाजी हायस्कूल तुळस, जनता विद्यालय तळवडे, न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा. वेशभूषा स्पर्धा (मोठा गट)-वेदांत नाईक (न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा), वरदा परब (वेंगुर्ले हायस्कूल, वेंगुर्ले), प्रांजल नार्वेकर (उभादांडा क्र. ३). सोलो डान्स स्पर्धा (मोठा गट)-निधी खडपकर (मिलाग्रिस, सावंतवाडी),
वैष्णवी बोडके (मदर क्विन्स, सावंतवाडी), सई राऊळ (स. का. पाटील विद्यामंदिर, केळुस). समूहगीत गायन स्पर्धा (लहान गट)-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंडूर, जयहिंद विद्यालय तुळस-फासतळी, श्री वेताळ विद्या मंदिर तुळस.
यावर्षी माध्यमिक शाळांच्या सर्वोत्कृष्ट सादरीकरणासाठी देण्यात येणारा मानाचा ''वेताळ करंडक'' संयुक्तरित्या जनता विद्यालय, तळवडे आणि श्री शिवाजी हायस्कूल, तुळस यांना प्रदान करण्यात आला. परीक्षण महेंद्र मातोंडकर, नागेश नाईक, रुपेंद्र परब, प्रा. विवेक चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सचिन परुळकर यांनी केले. आभार बी. टी. खडपकर यांनी मानले.