''१०८'' रुग्णवाहिकांना खासगी सेवेमध्ये घ्या
esakal January 16, 2026 07:45 PM

swt151.jpg
17960
रुजूल पाटणकर

‘१०८’ रुग्णवाहिकांना
खासगी सेवेमध्ये घ्या
रुजूल पाटणकर ः पालकमंत्र्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन १०८ रुग्णवाहिका सेवा खासगी रुग्णालयांपर्यंत नेण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे युवा नेते रुजूल पाटणकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांना सकारात्मक धोरण ठरवण्याची विनंती केली आहे.
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकदा तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असते, तर काही ठिकाणी अंतर जास्त असल्यामुळे तातडीच्या प्रसंगी रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल करावे लागते; मात्र अशा परिस्थितीत जर रुग्णाची प्रकृती अधिक खालावली आणि त्याला पुढील उपचारासाठी गोवा-बांबोळी किंवा जिल्हा रुग्णालयात हलवण्याची वेळ आली, तर १०८ रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. १०८ च्या नियंत्रण कक्षाकडून ''आम्ही खासगी रुग्णालयात सेवा देत नाही'' असे सांगितले जाते, ज्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होते.
श्री. पाटणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले की, खासगी रुग्णवाहिकांचा खर्च गोरगरीब रुग्णांना परवडणारा नसतो. खासगी रुग्णालयातून सरकारी रुग्णालयात किंवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रुग्णांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी १०८ रुग्णवाहिकांची संख्या वाढवावी आणि जिल्हा नियोजन समितीतून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून ही सेवा रुग्णांना मोफत मिळू शकेल. या संवेदनशील विषयावर पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष देऊन जिल्ह्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.