VHT 2026: विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत सौराष्ट्रने पंजाबला नमवलं, अंतिम फेरीत विदर्भाशी लढत
Tv9 Marathi January 17, 2026 06:45 AM

विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पंजाब आणि सौराष्ट्र हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा सौराष्ट्रच्या बाजून लागला. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 10 गडी गमवून 291 धावा केल्या आणि विजयासाठी 292 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान सौराष्ट्राने 39.3 षटकात 1 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह सौराष्ट्रने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत सौराष्ट्रचा सामनाविदर्भाशी होणार आहे. हा सामना 18 जानेवारीला होणार आहे.

पंजाबने फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. हरनूर सिंग आणि प्रभसिमरन सिंगने चांगली भागीदारी केली. पहिल्या विकेटसाठी 60 धावा जोडल्या. त्यानंतर प्रभसिमरन आणि अनमोलप्रीत सिंगने डाव पुढे नेला. या दोघांनी 109 धावांची भागीदारी केली. प्रभसिरमन सिंग 87 धावा करून बाद झाला. त्यानंतर अनमोलप्रीत सिंगने 105 चेंडूत 100 धावा केल्या. पण त्यानंतर डाव पत्त्यासारखा कोसळला. रमणदीप सिंगने 42 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही. तीन फलंदाजांना तर खातंही खोलता आलं नाही. सौराष्ट्रकडून चेतन साकारियाने 4, अंकुर पवारने 2 आणि चिराग जानीने 2 विकेट घेतल्या.

या धावांचा पाठलाग करताना सौराष्ट्रच्या हार्विक देसाई आणि विश्वराज जडेजा यांनी आक्रमक खेळी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 172 धावांची भागीदारी केली. हार्विक देसाई 64 धावा करून बाद झाला. त्यानंतर विश्वराज जडेजा आणि प्रेरक मंकड यांनी विजयी भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. विश्वराज जडेजाने 127 चेंडूत नाबाद 165 धावा केल्या. तर प्रेरक मंकडने 49 चेंडूत नाबाद 52 धावांची खेळी केली.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

सौराष्ट्र (प्लेइंग इलेव्हन): हार्विक देसाई (कर्णधार/विकेटकीपर), विश्वराज जडेजा, प्रेरक मांकड, समर गज्जर, चिराग जानी, रुचित अहिर, परस्वराज राणा, धर्मेंद्रसिंह जडेजा, अंकुर पनवार, जयदेव उनाडकट, चेतन साकारिया.

पंजाब (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग (कर्णधार/विकेटकीपर), हरनूर सिंग, अनमोलप्रीत सिंग, नमन धीर, नेहल वढेरा, रमनदीप सिंग, सनवीर सिंग, क्रिश भगत, सुखदीप बाजवा, मयंक मार्कंडे, गुरनूर ब्रार

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.