rat16p15.jpg-
O18180
रत्नागिरी : आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आयोजित सागर महोत्सवाचे अंबर हॉल येथे उद्घाटन करताना ज्येष्ठ शास्त्रज्ञ शैलेश नायक. सोबत नंदकुमार पटवर्धन, रामांजुल दीक्षित, रामबाबू सांका, डॉ. केतन चौधरी आदी.
rat16p17.jpg-
18184
रत्नागिरी : शास्त्रज्ञ शैलेश नायक यांचा सत्कार करताना नंदकुमार पटवर्धन.
---------
लोगो... सागर महोत्सव
‘डिजिटल ओशन’ भविष्यातील ब्लू इकॉनॉमीचा कणा
शैलेश नायक; आसमंतच्या सागर महोत्सवाला दिमाखात प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : भारतीय किनारपट्टी, महासागर आणि त्यावर आधारित अर्थव्यवस्था सुरक्षित, शाश्वत व हवामान सक्षम करण्याच्यादृष्टीने भारताने महत्त्वाची पावले उचलली असून, ‘डिजिटल ओशन’ ही संकल्पना भविष्यातील ब्लू इकॉनॉमीचा कणा ठरणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ शैलेश नायक यांनी केले.
आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आयोजित चौथ्या सागर महोत्सवात ते बोलत होते. टीआरपी येथील अंबर हॉल येथे हा महोत्सव सुरू झाला. भविष्यात वैज्ञानिक, पर्यावरणीय, सामाजिक व आर्थिक माहिती एकत्र करून डिजिटल ओशन विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता व मशिन लर्निंगचा वापर, क्षमतावृद्धी, ज्ञानवाटपासाठी संस्थात्मक चौकट आणि महासागरांचे जबाबदार संवर्धन हीच पुढील पिढ्यांसाठी शाश्वत गुंतवणूक ठरेल, असे नायक यांनी स्पष्ट केले.
नौवहन, मासेमारी, पर्यटन, तेल व वायू उत्पादनासाठी अत्यावश्यक असलेल्या कोस्टल ओशन स्टेट फोरकास्टिंग प्रणालीद्वारे दर तीन ते सहा तासांनी लाटांची उंची, दिशा, समुद्रप्रवाह, वाऱ्यांचा वेग, समुद्रपृष्ठ तापमान यांचा अचूक अंदाज दिला जातो. पुढील सात दिवसांचा अंदाज संपूर्ण भारतीय किनारपट्टीसाठी उपलब्ध असून, सध्या सुमारे सात लाखांहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते या सेवेचा लाभ घेत आहेत. भारतातील १७८ बंदरांसाठी भरती-ओहोटीचे अंदाज तसेच मच्छीमारांसाठी विशेष इशारे दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
किनारी भागांचे संरक्षण करण्यासाठी कोस्टल अॅंड मरिन एरिया मॅनेजमेंटअंतर्गत उपग्रह माहितीचा प्रभावी वापर केला जात आहे. सीआरझेड अधिसूचनेनुसार, उच्च व नीच भरती रेषा, पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रे, खारफुटी, जलकृषी तलाव, किनारपट्टीतील बदल यांचे नकाशीकरण केले जाते. राष्ट्रीय किनारी व्यवस्थापन केंद्र, एनसीसीआर आणि इनकॉईस या संस्था या कामात सक्रिय सहभाग घेत आहेत.
नायक यांनी ४०७७ कोटी रुपयांच्या डीप ओशन मिशनविषयी सांगितले की, ‘मत्स्य–६०००’ ही अत्याधुनिक पाणबुडी, बहुधातूक गाठींचे उत्खनन, समुद्रतळावरील जैवविविधतेचा अभ्यास आणि महासागर उष्णता ऊर्जेद्वारे वीज व गोड्या पाण्याची निर्मिती हे या मोहिमेचे प्रमुख घटक आहेत. हवामान बदलामुळे वाढणारी समुद्रपातळी, चक्रीवादळांची तीव्रता, सागरी उष्णतेच्या लाटा आणि किनारी धूप याबाबत बहुआपत्ती सल्ला सेवा विकसित केली जात आहे. उद्घाटनप्रसंगी मंचावर आसमंतचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन, पर्यटन संचालनालयाच्या विभाग संचालक प्रज्ञा मनोहर, एनआयओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नरसिंह ठाकूर उपस्थित होते.
----------
चौकट १
नद्या स्वच्छ ठेवणे अत्यावश्यक
सागर स्वच्छ ठेवायचा असेल तर नद्या स्वच्छ ठेवायला पाहिजेत, असे आसमंतचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी सांगितले. ते म्हणाले, नद्या वाचवल्या तर सागराचे प्रदूषण पण होणार नाही. पूर्वी नदी कधी सागराला मिळत नाही, असं वाटायचं आणि ही काळजीची गोष्ट होती; पण आजकाल ती चांगली गोष्ट आहे कारण, हल्ली वाढत चाललेल्या प्रदुषणामुळे सागर दूषित होऊ नये असं वाटतं. नद्यांच्या संरक्षणाची आवश्यकता आहे. प्लास्टिकचं योग्य व्यवस्थापन करायला पाहिजे.
----------
चौकट २
महोत्सवात आज
महोत्सवात १७ जानेवारीला सकाळी ७ वा. भाट्ये समुद्रकिनारी पुळणी किनारा अभ्यासफेरी, अंबर हॉल येथे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे मुख्य वैज्ञानिक डॉ. नरसिंह ठाकूर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ समीर डामरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शेखर मांडे यांची व्याख्याने, जबाबदार पर्यटनावरील लघुपट सादर होतील. सायंकाळी ४ वा. भाटकरवाडा येथे खडकाळ किनारा अभ्यासफेरी होणार आहे.