बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची एकनाथ शिंदे यांना कळकळीची विनंती की…
Tv9 Marathi January 24, 2026 05:45 AM

“माझ्या मनात याविषयी प्रचंड, प्रचंड दु:ख आहे. बाळासाहेबांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्याचवर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महौपार मुंबई महापालिकेत असणार नाही. याच्यासारखं दुसरं दु:ख नाही. जे कोणी बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो असं सांगतात, जे कोणी बाळासाहेबांचे आम्ही खरे वारसदार म्हणून सांगतात, त्या सर्वांना आवाहन वजा विनंती करतो की हे बाळासाहेबांचं जन्म शताब्दी वर्ष आहे. इथेच तुमची बाळासाहेबांवरती खरी श्रद्ध आहे का? बाळासाहेबांवर विश्वास होता का? बाळासाहेबांसमोर नतमस्तक होऊ इच्छिता का? बाळासाहेबांना श्रद्धांजली अपर्ण करु इच्छिता का? तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला महापौरपदासाठी पाठिंबा दिला पाहिजे” असं भास्कर जाधव म्हणाले. ते उद्धव ठाकरे शिवसेनेचे कोकणातील नेते आहेत.

“जर करत असाल तर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं पाहिजे. भाजपासोबत असलेल्या एकनाथ शिंदे यांना विनंती करतो की, तुम्ही भाजपला सांगितलं पाहिजे की, केंद्रात आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. तुमच्यासोबत राहू. महाराष्ट्रात तुमच्या सरकारला पाठिंबा दिला आहे, तुमच्या बरोबर राहू. पण हे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. म्हणून आपल्या मुंबईवर हा शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे” असं भास्कर जाधव म्हणाले.

गर्व, मान-अपमान बाजूला सारा

“एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला पाहिजे. भाजपला पाठिंबा देऊ नये. बाळासाहेबांमुळे आम्ही घडलो असं सांगता तर हे बाळासाहेबांचं जन्मशातब्दी वर्ष आहे. गर्व, मान-अपमान बाजूला सारुन बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी कमीपणा घेतला पाहिजे” असं भास्कर जाधव यांनी आवाहन केलं. पण दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाही महापौर बनू शकतो, त्यावर भास्कर जाधव यांनी “उद्धव ठाकरेंच्याच उमेदवाराला पाठिंबा द्यावा असं म्हणाले. कारण ती खरी शिवसेना आहे. तुम्ही शिवसेना तोडून, चोरुन नेली म्हणून मालक होऊ शकत नाहीत. भगवान के घर में देर हे अंधेर नही” असं ते म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.