Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात? भाजपमध्ये जोरदार लॉबिंग
Tv9 Marathi January 24, 2026 05:45 AM

Chhatrapati Sambhajinagar Mayor : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काल मुंबईत जाहीर झाली. याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. गुरुवारी मुंबईत सोडत प्रक्रिया पूर्ण झाली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले. मराठवाड्याच्या राजधानीत भाजप हा बहुमतापासून अवघे एक मत दूर आहे.११५ नगरसेवक असलेल्या या महापालिकेत भाजपच्या पारड्यात ५७ हून अधिक जागा आहेत. तर भाजपकडे महापौर पदासाठी १२ दावेदार आहेत. या दावेदारांची यादी प्रदेशाध्यक्षांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. आता महानगरपालिकेचा २३ वा महापौर कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.

भाजपमधून दावेदार कोण?

छत्रपती संभाजीनगरमध्ये दहा वर्षानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. आतापर्यंत शिवसेना-भाजप युतीचाच महापौराचा इथं वरचष्मा राहिला आहे. तर एमआयएम हा गेल्या दोन निवडणुकीत सर्वात अग्रेसर पक्ष ठरला आहे. गेल्यावेळी एमआयएमने २५ जागा घेऊन चर्चा घडवून आणली. तर यंदा एमआयएमने ३३ जागांसह शिवसेनेला पिछाडीवर टाकले आहे. भाजपने सर्वाधिक जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. यावेळी शहरात भाजपचा महापौर होईल.

मुंबईत महापौर पदाची सोडत निघताच छत्रपती संभाजीनगरमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे दिसून आली. भाजपमध्ये अनेक दावेदार असल्याचे समोर आले आहे. यामध्ये राजू वैद्य, समीर राजूरकर, सुरेंद्र कुलकर्णी, सविता कुलकर्णी, माधुरी अदवंत, महेश माळवतकर, अनिल मकरिये, विजय औताडे, अप्पासाहेब हिवाळे, शिवाजी दांडगे, राज वानखेडे, रामेश्वर भादवे, अनिल मकरिये यांच्या नावाची विशेष चर्चा आहे. यातील कोणत्या दावेदाराच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडते याकडे शहरवासियांचे लक्ष लागलेले आहे. या सर्व इच्छुकांची बैठक घेण्यात येणार आहे. कोअर कमिटीची सुद्धा बैठक होईल. त्यानंतर दावेदारांची नावं ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. मुंबईहून आलेल्या आदेशानंतर छत्रपती संभाजीनगरचा महापौर कोण याचं उत्तर मिळणार आहे.

मराठवाड्यात अनेक ठिकाणी विविध प्रवर्गातील महिलांसाठी महापौर पद आरक्षित आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा महिलेला या शहराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. या यादीत भाजपकडून दोन महिला नगरसेविकांची नावं पाठविण्यात येतील. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होते का, याकडं सर्वांच लक्ष लागलेलं आहे. तर शहराच्या कोणत्या भागातून महापौर येतो याची सुद्धा चर्चा रंगली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.