सुनेत्रा पवार मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार (Sunetra Pawar) यांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून होत आहे. असं असताना आता राष्ट्रवादी पक्षातूनच नवी माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व कुणी करायचं याला सर्वाधिक प्राथमिकता असल्याचं सांगण्यात येत आहे. आधी पक्षाचं नेतृत्व मग उपमुख्यमंत्रिपद असा प्राधान्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय मागे-पुढे होऊ शकतो.
दरम्यान, अजित पवार हे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडेच अध्यक्षपद देण्यात यावं अशी एक भूमिका राष्ट्रवादीतील काही नेत्यांची आहे. पक्ष अजित पवारांचा, त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपद पवार कुटुंबाकडेच राहावं असा एक मतप्रवाह आहे. अजित पवारांसारख्याच सुनेत्रा पवारही राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री दोन्ही होऊ शकतात अशी नेत्यांची भूमिका आहे.
दुसरीकडे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचं नावही अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. असं असलं तरी त्यांच्या नावापेक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडेच अध्यक्षपद सोपवण्याकडे कल आहे. त्यातच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरु असताना, ही प्रक्रियाही त्याचवेळी होते का याकडेही सर्वांचं लक्ष आहे. आज किंवा उद्या राष्ट्रवादीचे नेते बारामतीत अजित पवारांच्या रक्षाविसर्जन कार्यक्रमानंतर पवार परिवाराला भेटून याबद्दल चर्चा करू शकतात.
देवेंद्र फडणवीसांसोबत आज प्राथमिक चर्चा झाली आहे. देवेंद्र फडणवीसांना आम्ही येवढचं सांगितले की लवकरात लवकर निर्णय करायचा आहे. पक्षातील आमदारांशी बोलून आम्ही निर्णय घेणार आहोत. आज इतकेच आम्ही फक्त देवेंद्र फडणवीसांना सांगितलं. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार का?, असा प्रश्न प्रफुल पटेल यांना विचारण्यात आला. यावर सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा केली नाही, ती आम्ही अंतर्गत चर्चा केली आहे. कोणाला उपमुख्यमंत्रिपदावर बसवायचं हे आमदारांशी बोलून निर्णय घेणार आहोत. सगळ्यांच्या भावना समजून आम्ही निर्णय घेऊ, अशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली.
अजित पवारांच्या पश्चात आता दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आलाय. पक्ष एकत्रीकरणाचा निर्णय पवार कुटुंब एकत्र बसून लवकरच घेईल अशी माहिती समोर येतेय. मात्र अंतिम निर्णय शरद पवारच घेतील असं समजतंय. पक्ष एकत्रित करण्याच्या आधीच्या चर्चांमध्ये पवार काका पुतण्यासह सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे सहभागी झाले होते. मात्र आता अजित पवार नसल्याने पवार कुटुंबीय एकत्र बसून हा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आणखी वाचा