एका शहरात एकाच कॉलनीमध्ये कावळा आणि चिमणी राहत असत. कावळा आणि चिमणी लहानपणापासून एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स होते. अडीअडचणीला एकमेकांना मदत करत असत. म्हणजे हल्ली असते ना ‘पार्टनर्स इन क्राईम’, तसे काहीसे. कितीतरी खोड्या दोघांनी एकत्र केल्या आणि मोठ्यांना कळू न देता पचवल्यादेखील. सगळ्यांना आश्चर्यच वाटत असे की दोघे वेगवेगळ्या पक्षांमधील असूनही एकमेकांचे एवढे चांगले मित्र कसे? दोघेही कॉलेजमध्ये असताना कावळा-चिमणीचे प्रेमप्रकरण चालू आहे, अशीदेखील अफवा पसरली होती. खरे खोटे त्या दोघांनाच ठाऊक!
दोघांमध्ये एक मोठा फरक होता. चिमणी खूप कष्टाळू आणि धडपडी होती. आयआयएममध्ये शिक्षण घेऊन नंतर चिमणीने वेगवेगळे कोर्सेस केले आणि स्वतःचे स्टार्टअप चालू केले. लग्न करून ती आता सुखी होती. बँकेचे कर्ज काढून तिने आता ‘मेण अपार्टमेंट’मध्ये पाच खोल्यांचा फ्लॅट घेतला होता.
कावळा मात्र आळशी होता. लहान असल्यापासून टिवल्याबावल्या करण्यातच तो वेळ घालवत असे. मोठा झाल्यावर सुधारेल म्हणून तेव्हा त्याचे आईबाबा फार बोलले नाहीत; पण तो काही बदलला नाही. मोठा झाल्यावरदेखील कुठल्याही कामात तो तरबेज झालाच नाही. सारखा काव काव करत असे. आजूबाजूचे लोक त्याला वैतागत. टाळत. आता त्याचे आईवडील त्याला कामावरून, स्वभावावरून बोलू लागले. शेवटी एका राजकीय पक्षात तो कार्यकर्ता म्हणून जाऊ लागला. थोडेफार पैसे मिळू लागले. पुष्कळ बोलता येत असल्याने राजकीय पक्षात त्याची डाळ शिजली. पक्षाच्या वेगवेगळ्या सभांमध्ये तो भाषणे देऊ लागला. कसाबसा पैसा जमवून त्याने चिमणीच्या घरापासून
दूर ‘शेण अपार्टमेंट्स’मध्ये वन रूम किचन फ्लॅट घेतला.
चिमणीचे लग्न होऊन तिला आता दीड वर्षांचे बाळ होते. एका शहरात राहूनही कावळा-चिमणी भेटले नाहीत. अशातच त्यांच्या शाळेचं गेट टुगेदर ठरलं. सगळे गेट टुगेदरमध्ये भेटले आणि कावळ्याला नवचैतन्य प्राप्त झालं. सगळे अजून तसेच होते. विशेष करून चिमणी. त्याला वाटले की एवढे शिक्षण घेऊन, श्रीमंत होऊन ती बदलली असणार; पण ती तर एकदम तशीच होती. जुन्या आठवणी निघाल्या. लहानपणी आपण कसे ‘पार्टनर्स इन क्राईम’ होतो, याची आठवण दोघांनी काढली. इतकी वर्षे एका शहरात राहून चिमणीला आपण भेटलो नाहीत, याचे कावळ्याला आता वाईट वाटू लागले. शहरात गेल्यावर पुन्हा नक्की भेटण्याचे त्यांनी ठरवले. एवढेच नव्हे, तर ‘कसलीही मदत लागली तर सांग रे’ असे चिमणी हक्काने सांगून गेली. कावळ्याला बरं वाटलं.
जुलैत खूप पाऊस आला. कावळ्याचे शेण अपार्टमेंट पाण्याने भरले. फ्लॅट गळू लागला. सगळीकडे पूर आला. पुरात कावळ्याच्या फ्लॅटचे खूप नुकसान झाले. घरातील सगळ्या चीजवस्तू खराब झाल्या. सगळं नीट करायला भरपूर पैसे लागणार होते. तात्पुरते लागतील तेवढे कोणाकडे तरी मागावेत म्हणून कावळ्याने आपल्या पक्षश्रेष्ठींकडे पैसे मागितले; पण आज देतो, उद्या देतो करत त्याला पैसे मिळालेच नाहीत. त्याला एकदम लहानपणीच्या मैत्रिणीची आठवण झाली. चिमणीने मदत लागली तर हक्काने माग, असे सांगितलेच होते. त्याने पटकन फोन काढला आणि चिमणीला लावला. तिने उचलला नाही. कावळ्याने थोड्या वेळाने पुन्हा फोन लावला, चिमणीने फोन उचलला नाही; पण ‘आय विल कॉल यू बॅक इन सम टाइम’ असा मेसेज आला. दोन दिवस झाले तरी चिमणीचा ‘सम टाइम’ झालाच नाही. म्हणून कावळ्याने पुन्हा फोन लावला. आता मात्र चिमणीने लगेच उचलला. ‘‘सॉरी रे, खूप महत्त्वाचे प्रोजेक्ट चालू आहे. त्यातच बिझी आहे किती दिवसांपासून. करणारच होते तुला फोन. कशी काय बाबा आज मैत्रिणीची आठवण झाली?’’ असे चिमणी एकदम फ्रेंडली टोनमध्ये बोलल्यावर कावळ्याला बरे वाटले.
Premium|Funny shopping experiences : खरेदीचे अतरंगी किस्से‘‘अगं काही नाही सहजच फोन केला होता.’’ कावळा अवघडलेला होता.
‘‘हे बघ, मी तुला चांगली ओळखते. तू सहज फोन करणे शक्यच नाही. काय काम आहे ते सांग.’’ चिमणी त्याला चांगलेच ओळखून होती. आता चिमणीने एकदम कामाची गोष्ट केली तर कावळा पटकन म्हणाला, ‘‘तुला तर ठाऊक आहे. केवढा पाऊस झाला. सगळीकडे हाहाकार चालू आहे. तुमच्याकडे ठीक आहे ना सगळं?’’
‘‘हो रे. तसं ठीक आहे; पण माझ्या स्टार्ट अपमध्ये जरा गडबड चालू आहे. प्रोजेक्ट मिळण्यासाठी केवढं मागे लागावं लागतं. आणि मिळाले की रात्रंदिवस जीवतोड मेहनत. त्यात सगळे एम्प्लॉयी आमच्यासारख्या स्टार्टअपना एक स्टेपिंग स्टोन म्हणून वापरतात. कितीतरी गोष्टी आहेत. माझं जाऊ दे. तुझ्याकडे ठीक आहे का सगळं?’’
‘‘तसं ठीक आहे; पण पावसाने खूप नुकसान झालं. माझा तर फ्लॅट राहण्यायोग्य राहिलाच नाहीये.’’
‘‘अरे मग तू गावाकडे जा ना. तू असाही फ्री लान्सर आहेस. काय करतोस इथे राहून?’’
चिमणीने हा उपाय सांगिल्यावर कावळा चमकला.
‘‘अगं नाही गं. पूरग्रस्तांना मदत वगैरे खूप कामे आहेत पक्षाची. तू मला काही पैसे उधार देऊ शकतेस का? माझे काही लोकांकडून येणे बाकी आहे. ते आले की मी लगेच देऊन टाकीन.’’
‘‘तुला आताच सांगितले ना प्रोजेक्टचे काय हाल आहेत; पण तरीही बघते, काय करता येतं ते. तू मला शनिवारी सकाळी ११ वाजता फोन कर.’’
कावळ्याने शनिवारी बरोबर ११ वाजता फोन केला. चिमणीने उचलला नाही. कावळ्याने मेसेज केला. चिमणीचे उत्तर आले, ‘‘पैशांचे माझ्या लक्षात आहे. माझ्या बाळाचे शाळा प्रवेशाचे काम चालू आहे. ते झाले की तू मला फोन कर.’’
कावळ्याने आश्चर्याने मेसेज केला, ‘‘अगं तुझा मुलगा फक्त दीड वर्षांचा आहे. आता कुठला शाळा प्रवेश?’’
चिमणीने उत्तर दिले, ‘‘हल्ली इतक्या लवकर नंबर लावला तरच शाळेत प्रवेश मिळतो. तो शाळेत तिसऱ्या वर्षीच जाणार आहे.’’
काही दिवसांनी कावळ्याने पुन्हा मेसेज केला, चिमणीने उत्तर दिले, ‘‘थांब माझ्या बाळाचा बॅडमिंटन अकॅडमीमध्ये प्रवेश चालू आहे. त्याची फी भरायची आहे. पाच लाख रुपये फी आहे. ही नड भागली की मग तुला पैसे देते.’’
काही महिन्यांनी चिमणीने सांगितले, ‘‘थांब माझ्या बाळाचा वाढदिवस करायचा आहे. तो झाला की मग पैसे देते.’’
असे कित्येक महिने उलटून गेलेले आहेत. कावळ्याने कंटाळून मेसेज करणे बंद केले आणि अचानक एके दिवशी त्याला एका बँकवाल्याचा फोन आला. तो त्याला लोन ऑफर करण्यासाठी होता. ‘‘चिमणी मॅडमने आपका रेफरन्स दिया है.’’
एवढं सगळं होऊनदेखील कावळ्याच्या डोक्यात अजून प्रकाश पडलेला नाही. लोकांना पैसे मागतच फिरतो आहे. तुमच्याकडे कावळा पैसे मागायला आला तर अजिबात देऊ नका. दिलेत तर जुलैमधील पावसात पैसे बुडाले असे मनाशी ठरवून मगच द्या.
तात्पर्य - पावसाळ्यात चांगल्या गुणवत्तेची पुट्टी लावावी म्हणजे घर गळणार नाही.
लेखिका - चिमणीच्या स्टार्टअपमधील एम्प्लॉयी.