इंदापूर, ता. २ ः इंदापूर शहरातील शहा ग्लोबल स्कूलमध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.
शहरातील शहा ग्लोबल स्कूलच्या वतीने स्नेहसंमेलनाचे आयोजन शहा सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते. शाळेच्या व्यवस्थापकीय संचालिका रुचिरा शहा यांनी वार्षिक अहवालाचे सादरीकरण केले. स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आपले कलागुण सादर करताना गोविंदा आला रे आला, उधळीत येरे गुलाल, वासुदेव आला रे वासुदेव आला, कोळीगीत, पेरणी गीत, मंगळागौर, धनगर नृत्य अशा विविध गाण्यांवर सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी सादर करण्यात आलेल्या स्वर्गीय गोकुळदास विठ्ठलदास शहा व स्वर्गीय नारायणदास रामदास शहा यांच्या जीवनपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या जीवन चरित्राचे विद्यार्थ्यांकडून सादरीकरण करून घेण्यासाठी शिक्षिका अमृता चव्हाण, विद्या बडे, विद्या कराडे, समीक्षा, प्रगती डोंगरे यांनी प्रयत्न केले
यावेळी नगराध्यक्ष भरत शहा यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त मालती शहा, मुकुंद शहा, वैशाली शहा, शहा ग्लोबल स्कूलचे व्यवस्थापक अंगद शहा, रुचिरा शहा यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून विधीज्ञ नंदकुमार शहा, विधीज्ञ राकेश शुक्ल, ज्येष्ठ नागरिक संघांचे माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर, उद्योजक संजय दोशी, माजी मुख्याध्यापक अरविंद गारटकर, प्रा. मनोहर बेंद्रे, मे. लिलाचंद दलुचंद शहा परिवाराचे मुकुंद शहा व शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.