इचलकरंजी : रांगोळी येथील काळम्मावाडी वसाहत परिसरातील शुभम सादळे (वय २७) खुनाच्या गुन्ह्याचा (Shubham Sadale Case) उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. दोन दिवसांपासून पसार असणाऱ्या तीन संशयितांना अटक केली. दर्शन महेश कांबळे (वय २२), सागर सुनील माने (वय ३३) व प्रथमेश ऊर्फ पेप्या रवींद्र कांबळे (वय २३, तिघे माळभाग, रांगोळी) अशी त्यांची नावे असून तिघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
२९ जानेवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शुभम सादळे याच्यावर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. प्रेमप्रकरणात शुभम सादळे याने मदत केल्याचा राग मनात धरून दर्शन कांबळे, सागर माने व त्यांचा साथीदार प्रथमेश कांबळे यांनी शिवीगाळ करत शुभमच्या पोटात वार करून त्याचा खून केला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दोन स्वतंत्र पथके गेली दोन दिवस तपास करत होती. कर्नाटक राज्यातील बोरगाव, चांदशिरदवाड, चिक्कोडी, शिरगाव, बोंबलवाड, केरूर परिसर तसेच हुपरी, कुरुंदवाड व हातकणंगले परिसरातील एस.टी. स्टँड, लॉजेस, वर्दळीची ठिकाणे, एटीएम केंद्रे व पेट्रोल पंप येथे कसून शोधमोहीम राबविण्यात आली.
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस अंमलदार सागर चौगुले यांना मिळालेल्या माहितीनुसार पसार तिघेजण अतिग्रे फाटा (ता. हातकणंगले) येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शनिवारी (ता.३१) सापळा रचून दर्शन कांबळे, सागर माने, प्रथमेश कांबळे यांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर प्राथमिक चौकशीतच तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिघांची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी त्यांना शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक करून काल येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलिस अंमलदार सागर चौगुले, विशाल चौगुले, राजू कोरे, गजानन गुरव, नवनाथ कदम, प्रदीप पाटील आदींच्या पथकाने केली.
Sangli Hit and Run : सांगलीत 'हिट ॲण्ड रन'चा थरार; गणपती पेठेत चार पोलिसांसह 11 जखमी, बेधुंद चालकास जमावाकडून चोप रेकॉर्डवरील गुन्हेगाराची साथअटक करण्यात आलेला संशयित सागर माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा फायदा घेत कट आखून, पाठलाग करत योग्य संधी साधून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने हा खून अचानक घडलेला नसून पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनरांगोळी : येथील शुभम सादळे याचा गुरुवारी रात्री खून झाला होता. संशयित आरोपींना पकडण्यासाठी गावकऱ्यांनी तीन दिवस गाव बेमुदत बंद ठेवले होते. शनिवारी रात्री पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर बेमुदत बंद मागे घेण्यात आला. त्यानंतर गावातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. दरम्यान, रविवारी सकाळी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत खून प्रकरणातील संशयितांवर कठोर कारवाई करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पोलिसांना निवेदन देण्याचे ठरले. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.