‘इंतजार’फेम मालिकेच्या घराला आग
शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना; ३५ वर्षांपूर्वी हिंदी मालिकेमुळे प्रकाशझोतात
शहापूर, ता. ५ (वार्ताहर) : तालुक्यातील आटगाव येथील प्रदीप भानुशाली यांच्या ऐतिहासिक घराला गुरुवारी (ता. ५) दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ३५ वर्षांपूर्वी गाजलेल्या ‘इंतजार’ या हिंदी मालिकेचे चित्रीकरण या घरात झाले असल्याने, हे घर संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध होते. सुमारे ३५ वर्षांपूर्वी दूरदर्शनवर प्रदर्शित होणाऱ्या लोकप्रिय ‘इंतजार’ मालिकेचे चित्रीकरण याच घरात सलग सहा महिने सुरू होते. त्या काळात अनेक प्रसिद्ध हिंदी कलाकार या घरात आणि आटगाव परिसरात वास्तव्यास होते. यामुळे भानुशाली यांचे हे घर केवळ निवासस्थान न राहता तालुक्याचे एक प्रमुख आकर्षण ठरले होते.
घराच्या बांधकामात सागवानी लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. आगीची भीषणता पाहून स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत पाण्याचे टँकर बोलावले आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. घटनेची माहिती मिळताच शहापूर नगर पंचायतीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. ग्रामस्थांच्या मदतीने ही आग आटोक्यात आली असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते.