बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड कामगार जखमी
esakal February 06, 2026 11:45 AM

पिंपळवंडी, ता. ५ : काळवाडी (ता.जुन्नर) परिसरात ऊसतोड सुरू असताना बुधवारी (ता.४) दुपारी ऊसतोड मजुरावर बिबट्याने हल्ला केला व त्यास गंभीर जखमी केले.
शांताराम दामू भील (वय ४३, मूळ रा. जामनेर, जि. जळगाव) हे ऊस तोडणीचे काम करीत होते. त्यावेळी अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. बिबट्याचा पंजा लागल्याने ते जखमी झाले आहेत. दरम्यान, शेजारील मजुरांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला.
घटनेची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले शांताराम यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नारायणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. बिबट्याच्या भीतीच्या सावटाखाली येथील शेतकरी व नागरिक जीवन जगत असून, यावर लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाय होणे गरजेचे आहे. ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांनी सांगितले की, ऊसतोड कामगार व शेतमजूर यांनी शेतात काम करत असताना सतत जागरूक राहणे गरजेचे आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.