- rat९p५.jpg-
२६O२३११३
रत्नागिरी ः नाट्य मल्हार प्रतिष्ठान, अहिल्यानगर या संस्थेने सादर केलेल्या ‘अय’ या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
-----
राज्य नाट्यस्पर्धा------लोगो
मुक्या पीडित नवविवाहितेची व्यथा मांडणारे ‘अय’
नाट्य मल्हार प्रतिष्ठान ; कलाकारांच्या अभिनय, नेपथ्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः अत्याचार झालेल्या एखाद्या मुक्या स्त्रीला पतीने केवळ पती न राहता तिचा ‘बाप’ होऊन आधार दिला तर ती मानसिक धक्क्यातून बाहेर पडू शकते आणि उद्ध्वस्त होणारा संसार सुखाचा होऊ शकतो, असा प्रबोधनपर संदेश ‘अय’ या नाटकातून देण्यात आला आहे. राज्य नाट्यस्पर्धेत ‘नाट्य मल्हार प्रतिष्ठान, अहिल्यानगर’ या संस्थेने येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा प्रयोग सादर केला.
लेखक-दिग्दर्शक संदीप दंडवते यांनी या नाटकाची संहिता अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. पीडित मुक्या नवविवाहितेच्या समस्यांचा उलगडा करताना हे नाटक गंभीर विषयासोबतच विनोदी अंगानेही पुढे जाते. नाटकातील कलाकारांचा सहज अभिनय आणि नेटके नेपथ्य यामुळे प्रेक्षक शेवटपर्यंत खिळून राहिले होते. शारीरिक व्यंग आणि भूतकाळातील आघात पचवून एक खंबीर जोडीदार आयुष्यात काय बदल घडवू शकतो, याचे उत्तम दर्शन या प्रयोगातून घडले. या प्रयोगाला रत्नागिरीतील रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
-----
मुक्या नवविवाहितेची काळजात भिडणारी व्यथा, ‘अय’ नाटकातून मांडण्यात आली आहे. एका बालपणी अत्याचारग्रस्त मुक्या नवविवाहित स्त्रीची आणि बोबड्या नवऱ्याची संघर्षगाथा ‘अय’ या नाटकातून लेखकाने अत्यंत संवेदनशीलपणे मांडली आहे. शारीरिक व्यंग आणि मानसिक आघात यावर प्रेमाच्या मायेने कशी मात करता येते, याचे जिवंत चित्रण या नाटकात पाहायला मिळते.
रंगमंचावर पडदा उघडताच गावातील ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेतील खेळांच्या घोषणा ऐकू येतात. या वातावरणात वैशाली आणि आनंद हे नवविवाहित जोडपे आपल्या घरात खेळत असतात. आनंद हा वयाने मोठा आणि बोलताना अडखळणारा (हाकला) असला तरी तो स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ आणि मदत करणारा आहे. याउलट, त्याची पत्नी वैशाली पूर्णपणे मुकी आहे. लग्नानंतरच्या उखाण्यांच्या कार्यक्रमात वैशाली मुकी असल्याने सहभागी होऊ शकणार नाही, अशी चर्चा शेजारी करतात, तिथूनच त्यांच्या संघर्षाची ठिणगी पडते.
वैशाली सतत भेदरलेली आणि घाबरलेली असते. बालपणी तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा खोलवर परिणाम तिच्या मनावर झालेला असतो. आनंद तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो; पण ती त्याच्यापासून लांब पळते. अशा वेळी आनंद तिला खंबीर साथ देतो. ‘मी तुझ्याशी मुकी म्हणून लग्न केलेले नाही; मला तुझी कुबडी नव्हे तर खांदा व्हायचे आहे,’ असे म्हणत तो तिला भूतकाळ विसरून नवे आयुष्य जगण्याची उमेद देतो. विवाहापूर्वीच्या अत्याचाराची माहिती असूनही आनंदने तिला स्वीकारले आहे, हे जेव्हा वैशालीला कळते तेव्हा तिच्या वागण्यात हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागतो.
नाटकाच्या चाळीतील वातावरणात डहाळेकाकू, त्यांचा मुलगा छबू, मंदबुद्धी ‘सविस्तर’ आणि भाजीवाला भय्या यांच्या वावरातून नाटकाला गती मिळते. सविस्तरचे कोड्यांचे वेड, भय्याची हिंदी धाटणीची बोली आणि डहाळेकाकूंचे विस्कळीत बोलणे यातून उत्कृष्ट विनोदनिर्मिती होते; मात्र, याच चाळीत छबूसारखी विकृत नजर असणारी पात्रेही आहेत ज्यामुळे वैशालीची सुरक्षा धोक्यात येते.
नाटकाचा परमोच्च बिंदू तेव्हा येतो जेव्हा छबू वैशालीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो. आनंदने तिला दिलेली शिकवण ‘स्वतःची लढाई स्वतः लढायला शिक’ तिला आठवते. ज्या आवाजाला आजवर जगाने दाबले होते त्याच गळ्यातून ‘अऽय’ असा ठाम हुंकार निघतो आणि वैशाली धैर्याने त्या संकटाचा प्रतिकार करते. मुक्या नवविवाहितेची संवेदनशील भूमिका, आनंदचा ‘हाकला’ स्वभाव असूनही त्याचे प्रगल्भ विचार, सविस्तरचे खुसखुशीत संवाद आणि प्रभावी नेपथ्य यामुळे हे नाटक रसिकांच्या मनाला खोलवर स्पर्श करते. समाजातील शोषितांच्या संघर्षाला वाचा फोडणारे हे नाटक निश्चितच विचार करायला लावणारे आहे.
---
* सूत्रधार आणि सहाय्य
लेखक व दिग्दर्शक ः संदीप दंडवते, प्रकाशयोजना ः विनोद गरूड, संगीत संयोजन ः अंतरा वाडेकर, ऋषी सकट, नेपथ्य ः प्रमोद जगताप, रंगभूषा ः चंद्रकांत सैदाणे, रंगभूषा सहाय्यक ः समर्थ जोशी, वेशभूषा ः गौरी देशपांडे, पवन पोटे, रंगमंच व्यवस्था ः प्राजक्ता दंडवते, संकेत साबळे, अक्षय कुलकर्णी, संकेत जगदाळे.
----
* पात्र परिचय
वैशाली ः अश्विनी अंचवले-कुलकर्णी, आनंद-संदीप दंडवते, छबू ः प्रद्युम्न गायकवाड, सविस्तर ः प्रदीप वाळके, डळाळेकाकू ः प्रिया साबळे, भय्या ः प्रतीक अंदुरे, वडील ः गणेश लिमकर.
----
आजचे नाटक
नाटक ः दी हिंदू लेडी. सादरकर्ते ः नवहिंद बालमित्र मंडळ, वेळ ः सकाळी ११.३० वा.. नाटक ः ओय ले ले. सादरकर्ते ः नवरस कलारंग सांस्कृतिक अकादमी, बोईसर. स्थळ ः स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी. वेळ ः सायंकाळी ७.३० वाजता.