पिंपरी, ता. ९ ः महापालिका शहर अभियंता मकरंद निकम यांचा स्वेच्छानिवृत्ती अर्ज आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंजूर केला आहे. त्यानुसार २८ फेब्रुवारी रोजी निकम कार्यमुक्त होत आहेत. त्यामुळे शहर अभियंतापदी कोण? अशी चर्चा सुरू आहे. सद्यःस्थितीत तीन अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू असून, शहर अभियंतापदाची कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, बांधकामे अशा विविध विकास कामांच्या तांत्रिक विभागाचे प्रमुख म्हणून महापालिकेतील शहर अभियंतापद प्रतिष्ठेचे आणि अतिमहत्त्वाचे आहे. त्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअर) शाखेची पदवी अत्यावश्यक असते. शिवाय, महापालिका सेवेतील अभियंत्यांची सेवाज्येष्ठतेनुसार शहर अभियंता पदावर वर्णी लागते. विशेषतः सहशहर अभियंतापदी कार्यरत अधिकाऱ्यालाच पदोन्नती देऊन शहर अभियंतापदी नियुक्ती केली जाते. विद्यमान शहर अभियंता मकरंद निकम यांनी तीन महिन्यांपूर्वी वैद्यकीय कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती मिळविण्यासाठी प्रशासन अर्थात आयुक्तांकडे अर्ज केला होता. त्यास आयुक्तांनी मंजुरी दिली असून, त्यांना २८ फेब्रुवारी २०२६ रोजी कार्यमुक्त केले जाणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये शहर अभियंतापदी नियुक्तीसाठी चुरस निर्माण झाली आहे.
तीन अधिकारी पण...
महापालिका शहर अभियंतापदी सहशहर अभियंता पदावरील अधिकाऱ्याची सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीने नियुक्ती केली जाते. मात्र, चार वर्षांपूर्वी शहर अभियंतापदाला समांतर मुख्य अभियंता पदाला सरकारने मंजुरी दिली आहे. त्यापदांवर सहशहर अभियंता पदावरील व्यक्तीलाच पदोन्नती दिली जाते. त्यामुळे सेवाज्येष्ठतेनुसार प्रमोद ओंभासे व संजय कुलकर्णी यांची मुख्य अभियंतापदी वर्णी लागली आहे. सद्यःस्थितीत सहशहर अभियंतापदी मनोज सेठिया कार्यरत आहेत. त्यांच्यासह अन्य अधिकारीही शहर अभियंतापदासाठी स्पर्धेत आहेत.
शहर अभियंत्याचे अधिकार-कर्तव्ये
१) बांधकाम परवानगी व विकास ः नियमानुसार वाढीव एफएसआय किंवा उंची मान्य करणे आणि घरमालकांना दुरुस्ती परवानगी देणे
२) अनधिकृत बांधकाम नियंत्रण ः शहरात होणाऱ्या बेकायदेशीर बांधकामांवर नियंत्रण ठेवणे, अतिक्रमण काढणे, तक्रारींचे निराकरण करणे
३) पायाभूत सुविधांची देखभाल ः शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक इमारतींची बांधकामे व दुरुस्ती करणे
४) तांत्रिक व प्रशासकीय नियंत्रण ः कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंत्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवून कामांची पाहणी करणे
५) निविदा प्रक्रिया ः शहराच्या विकास कामांसाठी निविदा मागवणे, छाननी करणे आणि कंत्राटदारांना कामे वाटप करणे
६) न्यायालयीन बाबी ः महापालिकेच्या बांधकाम विभागाशी संबंधित प्रकरणांत कनिष्ठ न्यायालयात जबाब देणे, साक्षी दाखल करणे
‘‘महापालिका सेवेतील सहशहर अभियंता पदावरील व्यक्तीची शहर अभियंतापदावर पदोन्नतीने नियुक्ती केली जाते. आताच्या नियुक्ती संदर्भात आयुक्तांशी चर्चा केली जाणार आहे.
- मनोज लोणकर, उपआयुक्त, प्रशासन विभाग, महापालिका
---