जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा परिषदेसह नऊ पंचायत समित्यांसाठी शनिवारी सरासरी ५६.७९ टक्के मतदान झाले. मतदानाचा टक्का घसरला असला तरीही महिला मतदारांचा टक्का पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आज सुरू असलेल्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दुपारी १ वाजेपर्यंत निकाल हाती येईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेंची शिवसेना आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. रत्नागिरीत १० पैकी ८ जागांवर शिंदेंची शिवसेना आघाडीवर आहे. तर दोन जागांवर अपक्ष उमेदवाराने आघाडी घेतलीय. टपाली मतदानानंतर आता ईव्हीएम मशिनची मतमोजणी सुरू झाली आहे. ११ ते १९ फेऱ्यांपर्यंत मतमोजणी होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी २२६ आणि पंचायत समित्यांच्या ११२ जागांसाठी ४४४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीतून बाहेर पडणार आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावरून पोलिस बंदोबस्तात प्रत्येक तालुक्यातील स्ट्रॉगरूममध्ये नेण्यात आल्या. स्ट्राँगरूमबाहेर पोलिसांचा खडा पहारा ठेवला आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता आहे.
शेतकऱ्याला तहसीलदाराचा आत्महत्या करण्याचा अजब सल्ला, कृषीमंत्र्यांचं पालकत्व असलेल्या जिल्ह्यातला प्रकारजिल्ह्यात ११ लाख ७३ हजार ९०२ मतदारांपैकी ६ लाख ५४ हजार ९४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा टक्का घसरला असल्याचे चित्र यंदा पाहायला मिळाले आहे. झालेल्या मतदानामध्ये तीन लाख १८ हजार ६६२ पुरुष, तर तीन लाख ३६ हजार २८५ महिला मतदारांनी मतदान केले. त्यात महिलांचा टक्का पुरुषांपेक्षा अधिक आहे. चिपळूण तालुक्यात पुरुष मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मतदारांचा कल कुणाकडे राहणार याबाबत उत्सुकता आहे. नऊ तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी होणार असल्याने निकाल दोन तासांत जाहीर होईल, असा अंदाज आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील वर्चस्व राखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे शिवसेना अशी चुरस आहे. या निवडणुकीत पालकमंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार शेखर निकम हे सत्ताधारी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते, तर विरोधी पक्षाचे ठाकरे सेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची प्रतिष्ठापणास लागली आहे. आमदार जाधव यांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी भाजपसह शिंदे शिवसेनेकडून जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे निकाल कोणकोणाला धोबीपछाड देणार याची उत्सुकता आहे.
नेत्यांच्या नातेवाइकांची सत्त्वपरीक्षा
आमदार शेखर निकम यांच्या पत्नी पूजा निकम, आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा ठाकरे शिवसेनेचा जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, राज्यमंत्री योगेश कदम यांचे काका अण्णा कदम, माजी आमदार सुभाष बने यांचे सुपुत्र रोहन बने, माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी नेहा माने यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.