अंगावर काटा आणणारा थरार! समोर वाघ आणि मागे विहीर; शेतकऱ्यासह बैलाची जीव वाचवण्यासाठी धडपड, शेवटी...
esakal February 24, 2026 06:45 AM

समुद्रपूर : तालुक्यातील कोरा गावाजवळील नारायणपूर येथे शेतकरी आपल्या शेतातील कापूस बैलगाडीमध्ये भरून घराकडे जात असताना डुकराच्या मागे वाघाला पाहून बैलगाडीसह बैल विहिरीत पडले. यात एका बैलाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याला वाचविण्यात यश आले. शेतकरीही थोडक्यात बचावला.

प्राप्त माहितीनुसार शनिवारी (ता. २१) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास नारायणपूर येथील शेतकरी श्रीधर रामकृष्ण सालवटकर (वय ५५) यांनी दिवसभर मजुरांनी वेचलेला शेतातील कापूस बैलगाडीमध्ये भरून घेऊन जात असतानाच बैलगाडीसमोर अचानक डुकरांचा कळप आला. डुकरांना पाहताच बैल थांबले. मात्र या डुकरांच्या मागे असलेला वाघ दिसताच बैल बैलगाडीसह सैरावैरा पळायला लागले.

Jafrabad: आढा शिवारात विहिरीत पडले तीन रोही, दोघांचा झाला दुर्दैवी मृत्यू

शेतकरी श्रीधर सालवटकर यांनी प्रसंगावधान राखत बैलगाडीच्या बाजूला झाल्याने त्यांचे प्राण वाचले, मात्र ते जखमी झाले. बैल जवळील असलेल्या विहिरात बैलगाडीसह पडले. घटनेची माहिती शेतकर्याने कोरा येथील मनोज बारसकर यांना देताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गावकरीसुद्धा पोहोचले.

Nagbhid News : मिंथूर, नवेगावपांडव ही जुळी गावे पुन्हा कर्जाच्या गर्तेत जाणार

संदीप मारबते, उल्हास पडवे, चंद्रशेखर पिसे, स्वप्निल इखार, खैराज यादव, प्रफुल्ल सालवटकर व कोरा येथील भोई समाजातील युवक व गावकऱ्यांच्या सहकार्याने विहिरीतून एका बैलाला जिवंत काढले. मात्र दुसऱ्या बैलाला वाचविण्यात त्यांना अपयश आले. शेतकरी श्रीधर सालवटकर यांनी १५ दिवसांपुर्वीच २ लाख रुपये किमतीची बैल जोडी विकत घेतली होती. घटनेची माहिती मिळताच गिरडचे ठाणेदार विकास गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.