मुंबई : राज्यामध्ये शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीसाठी किडनी विकावी लागते यासारखी लज्जास्पद गोष्ट नाही. हे किडनी रॅकेट संघटित गुन्हेगारीसारखे आहे. त्यामुळे त्यांच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करा, या मागणीसाठी बुधवारी (ता. २५) विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांनी आग्रही मागणी केली. मात्र गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या गुन्ह्यातील आरोपींची संपत्ती गोठविण्यात येईल.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत, अशी माहिती सभागृहात दिली. तसेच परवानाधारक सावकारांनी दर तीन महिन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीला कर्जाचा तपशील सादर करावा लागेल.
तसेच पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री भोयर यांनी दिले. भाजपचे अतुल भातखळकर यांच्यासह काशिनाथ दाते, सुधीर मुनगंटीवार, अबू आझमी, गोपीचंद पडळकर, सुरेश धस, विजय वडेट्टीवार यांनी किडनी रॅकेट संदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावरील चर्चेदरम्यान सर्वपक्षीय सदस्यांनी या रॅकेटमध्ये सहभागी गुन्हेगारांना तातडीने ‘मकोका’ कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी केली.
यावर गृहराज्यमंत्री भोयर यांनी फेसबुकच्या माध्यमातून हे किडनी रॅकेट तयार झाले आहे. यातील शेतकऱ्यांना कंबोडिया येथे नेऊन त्यांची किडनी काढून विकण्यात आली आहे. तसेच तमिळनाडू येथेही हॉस्पिटलमध्ये किडनी काढण्याचा प्रकार घडला आहे. या रॅकेटमधील सर्व आरोपींना पकडण्यात आले असून दोन आरोपी फरार आहेत. या आरोपींची संपत्ती गोठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.
यावर भातखळकर यांनी ही संघटित गुन्हेगारी असून ‘मकोका’ कायद्यांतर्गत कारवाई केली पाहिजे. सावकारांची हाव संपत नाही. केवळ कर्ज देणे आणि पैसे वसूल करणे इतक्या पुरता हा विषय नाही. त्यामुळे यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करून हे प्रकरण निकाली काढले पाहिजे, अशी मागणी केली.
शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांनीही ‘मकोका’अंतर्गत कारवाई करण्याची मागणी लावून धरली. हे केवळ चंद्रपुरात घडत नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडत आहे. खासगी सावकार शंभर रुपयाला २५ ते ३० रुपयांचे व्याज आकारतात. काही ठिकाणी तासाला व्याज लावले जात आहे. त्यामुळे आता कडक कारवाईची गरज आहे. यावर राज्यमंत्री भोयर यांनी ‘मकोका’ कायद्यातील तरतुदी तपासून कारवाई करण्यात येईल, असे उत्तर दिले. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या डॉक्टरची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफासरस केली होती, तरीही त्याच्यावर कारवाई केली जाईल. ज्या शेतकऱ्यांच्या किडन्या काढल्या आहेत, त्यातील केवळ दोनच शेतकरी महाराष्ट्रातील आहेत, असेही ते म्हणाले.
Latest Marathi News Live Update: वॉर्ड क्रमांक 206 शिवडी चे महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन पडवळ यांच्या कार्यालयाचे उद्घाटन रॅकेटमधील डॉक्टरची ‘पद्मश्री’ साठी शिफारसया रॅकेटमधील डॉक्टरला अटक होणारच नाही, असा दावा काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. ते म्हणाले, की या रॅकेटमध्ये तमिळनाडूमधील हॉस्पिटलमध्ये किडनी काढण्याचे ऑपरेशन करणारा डॉक्टर हा दिल्लीतील आहे. त्याची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे त्याला अटक होणार नाही. खरे तर ही इतकी संतापजनक बाब आहे, की यातील आरोपींना फाशीच दिली पाहिजे. पीडित शेतकरी एका किडनीवर पुढील आयुष्य जगणार आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री साह्यता निधीतून दहा लाखांची मदत दिली पाहिजे.