सोलापूर : मंजूर लेआऊटमधील खुल्या जागांची बेकायदा खरेदी-विक्री व्यवहार होत असल्याचे प्रकार उघडकीस आले. अशा १० तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होत्या. यापैकी २ तक्रारीमध्ये व्यवहार झालेल्या २ नोंदी रद्द करण्यात आल्या आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. आमदार विजय देशमुख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले आहे.
मंजूर लेआऊटमधील खुल्या जागांची बेकायदा खरेदी-विक्री व्यवहार होत असल्याच्या तक्रारीवरून १३ जानेवारी २०२६ रोजी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. चौकशी समितीने केलेल्या चौकशीत माढा तालुक्यातील भोसरे याठिकाणी दोन तर सोलापूर शहरातील अक्कलकोट रस्त्यावरील यशराज नगर येथे मंजूर लेआऊटमधील जागांची खरेदी-विक्री झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात दोषी आढळून आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. शिवाय दस्तनोंदणीबाबतही मुद्रांक जिल्हाधिकारी यांना दस्तलेखनिकावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एका प्रकरणात फेरफार नोंद पुनर्विलोकनात घेण्याची कार्यवाही सुरू आहे. इतर ७ तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर चौकशी सुरू असून चौकशी अहवाल येताच कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री यांनी अधिवेशनात उत्तरात सांगितले.
सखोल चौकशीची गरजआमदार विजयकुमार देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे शहरातील बेकायदा खरेदी-विक्रीबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या. याध्ये शहरात विशेषत: हद्दवाढ भागात अनेक मंजूर लेआऊटमधील जागांचे बेकायदा व्यवहार करण्यात आले आहेत. यामध्ये फक्त १० तक्रारी समोर आल्या आहेत, पण अनेक व्यवहार आहेत, त्याची चौकशी केल्यास सत्य समोर येणार असल्याचे नमूद केले होते. समितीसमोर फक्त १० प्रकरणे आली आहेत पण याच्या सखोल चौकशीची गरज आहे.