Maharashtra Missing Women and Minor Girls: महाराष्ट्रात महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये वाढल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारनेच विधिमंडळात सादर केली आहे. या गंभीर विषयावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास आणि शोधमोहीम अधिक तीव्र करण्याचे आश्वासन दिले आहे.
काँग्रेस नेते भाई जगताप यांनी या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेत सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "शहरी भागातून मोठ्या प्रमाणावर मुली गायब होत आहेत. साधारण 12 हजार महिला बेपत्ता असून त्यात 2 हजार अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. राज्याच्या यंत्रणा राबवूनही जर इतक्या मोठ्या प्रमाणात लेकी-बाळी बेपत्ता होत असतील, तर ही बाब राज्यासाठी भूषणावह नाही. हा मुलींच्या सुरक्षेचा अत्यंत गंभीर प्रश्न आहे."
या गंभीर विषयावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडली. ते म्हणाले, अनुभवानुसार, पहिल्या वर्षभरात साधारण 55 ते 60 टक्के महिलांचा शोध लागतो. अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीत आपण 90 टक्क्यांपर्यंत पोहोचतो. आमचे उद्दिष्ट 95-96 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचे आहे आणि तोपर्यंत आम्ही काम थांबवणार नाही. अनेकदा वर्षभरानंतर मुलींचे कुटुंबीय किंवा वयस्कर व्यक्तींच्या बाबतीत नातेवाईक पाठपुरावा करणे सोडून देतात, ही एक मोठी अडचण असल्याचे त्यांनी नमूद केले. महिला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दर महिन्याला या विषयावर बैठक घेतली जाते. ज्या पोलीस स्थानकांनी किंवा अधिकाऱ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे, त्यांची दखल घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. बेपत्ता महिलांना शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, कोणत्या पोलीस स्थानकाने किती शोध लावला आणि त्यात आणखी काय सुधारणा करता येतील, यावर शासन भर देत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या