किरण कवडे नाशिक: ज्योर्तिलिंग त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ व कमीत कमी वेळेत दर्शनाची सुविधा उपलब्ध न करणे, हाच श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांना लुटण्याचा प्रशस्त मार्ग बनला आहे. यामुळे दर्शनरांगेत उभे राहण्याइतका वेळ नसलेले भाविक दर्शनासाठी इतर पर्यायांचा शोध घेवू लागताच त्यांना अलगद हेरायचे आणि त्यांची लूट करायची, असा मंदिर परिसरात पायंडा पडल्याचे ‘सकाळ’ ने केलेल्या ग्राउंड रिपोर्टमध्ये आढळून आले. त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शन कमीत कमी वेळेत कसे होईल व भाविकांना पेड दर्शनाची सुविधा सहजपणे समजू शकेल, अशी व्यवस्था निर्माण करणे हाच यावरील सक्षम पर्याय असल्याचेही स्थानिक व भाविकांशी केलेल्या चर्चेतून समोर आले आहे.
त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला सुरक्षारक्षकांनी लाथाबुक्यांचा ‘प्रसाद’ दिल्याचा वेदनादायक प्रकार समोर आल्यानंतर दर्शन व्यवस्थेतील अनेक त्रूटी निदर्शनास आल्या. विनामूल्य दर्शनरांगेत किमान तीन तास उभे राहावे लागते. २०० रुपयांचा ऑनलाइन पास काढून विशेष दर्शन रांगेत सहभागी कसे व्हायचे, याविषयी भाविकांना माहिती मिळत नाही, किंबहुना ही माहिती मिळू नये, अशीच व्यवस्था कार्यरत दिसते.
भाविकांना कुठल्या प्रवेशद्वाराने दर्शन रांगेत जाता येते, याविषयी स्पष्टता नसल्याने भाविकांचा गोंधळ होतो. त्यांच्यासमोर काही भाविकांना आतमध्ये प्रवेश दिला जातो, तर काहींना नाकारला जातो. यामागील कारणे त्यांच्या लक्षात येत नाहीत आणि भाविकांच्या मानसिक स्थितीचे रूपांतर हे सुविधांच्या नावाखाली अर्थकारणाशी जोडले जाते. मंदिराभोवती फिरणारे दलाल श्रीमंत भाविकांच्या शोधात असतात.
परराज्यातील भाविकांना ते अचूकपणे हेरतात. त्यांना फक्त मंदिरापर्यंत पोचविण्याचे दोनशे रुपये घेतले जातात. पास काढून दर्शनासाठी पाठविण्याचे प्रतिव्यक्ती ४०० ते ४५० रुपये घेण्याचा हा एक प्रकारे व्यवसाय बनला आहे. या पुढेच पाऊल म्हणजे दहा मिनिटांत दर्शन घ्यायचे असल्यास सोमवार ते शुक्रवार हजार ते पंधराशे रुपये आणि शनिवारी, रविवारी तर थेट अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत भाव वाढतात. वेळ नसलेले भाविक या ‘दर्शन स्कीम’ ला बळी पडतात.
थेट सनदी अधिकारी नियुक्तीचा प्रस्ताव
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये जिल्हा न्यायाधीश हे पदसिद्ध अध्यक्ष तर नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे पदसिद्ध सचिव आहेत. या दोघांव्यतिरिक्त परंपरेनुसार तीन विश्वस्त आणि भाविक प्रतिनिधी म्हणून चौघांची नियुक्ती केली जाते. विश्वस्त मंडळात असे एकूण ९ प्रतिनिधी पाच वर्षांसाठी कारभार सांभाळतात.
या मंडळात थेट सनदी अधिकारी (आयएएस) नियुक्त करण्याचा प्रस्ताव तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनासमोर ठेवला होता. पण विश्वस्त नियुक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अटी व शर्ती घालून दिलेल्या आहेत. त्यात बदल करण्याचा अधिकार स्थानिक स्तरावर नसल्याने या प्रस्तावाची अद्याप अंमलबजावणी होवू शकलेली नाही.
नागमोडी वळणाचे चार हॉल
गेल्या पाच वर्षांत त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या तुलनेत भाविकांना मिळणाऱ्या सुविधा कमी पडतात आणि मूलभूत सुविधांवर त्याचा ताण पडतो. विनामूल्य दर्शन रांगेत भाविकांना दोन तास उभे राहण्यासाठी नागमोडी वळणाचे चार हॉल आहेत. यातील एका हॉलमध्ये १० रांगा असून ३०० ते ३५० भाविक उभे राहू शकतात.
त्यांच्यासाठी चार फॅन आणि दोन छोटे एलईडी स्क्रीन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वयोवृद्ध व्यक्ती व लहान बालकांना बसण्याची व्यवस्था केली आहे. याशिवाय प्रत्येक हॉलमध्ये हिरकणी कक्ष असल्याने स्तनदा मातांना येथे बसण्याची व्यवस्था होवू शकते. दर्शन रांगेतून सर्वसामान्य भाविक एक-एक पाऊल पुढे सरकतात. त्यांची गती ही मुख्य गाभाऱ्याजवळील भाविकांवर अवलंबून असते.
ज्या पद्धतीने ते पुढे सरकतील, तशी भाविकांची दर्शन रांग पुढे सरकत जाते. गर्दीची वेळ किंवा सुटीचा कालावधी नसेल तेव्हा दर्शनासाठी किमान दोन ते तीन तासांचा अवधी लागतो. श्रावण महिन्यात, पितृपक्षात किंवा उन्हाळी व दिवाळीच्या सुटीत भाविकांचा ओघ जास्त असल्याने दर्शनासाठी सहा तास लागतात. सर्वसाधारण वेळेपेक्षा तीन पट जास्त वेळ लागतो, येथे भाविकांची खरी दमछाक होते.
मंदिराच्या सुरक्षेसाठी देवस्थान ट्रस्टने ८० शिपाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच गेल्या वर्षापासून ‘एमएसएफ’चे ५५ सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत. दोघांच्या खांद्यावर मंदिराची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येते. ‘सकाळ’चे प्रतिनिधी दुपारी दीड ते पावणेतीनपर्यंत पूर्व दरवाजाजवळ कॅमेरा घेऊन बसले. तरी त्यांची साधी विचारणा सुरक्षारक्षकांनी केली नाही. या दरम्यान भाविकांची वर्दळ सुरू होती. सुरक्षारक्षकच नसल्याने मंदिराची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे निदर्शनास आले. मग इतक्या सुरक्षारक्षकांची नियुक्ती कशासाठी करण्यात आली असा प्रश्न उपस्थित होतो.
पेड दर्शन तिकीट मर्यादा २० टक्केच का?
त्र्यंबकेश्वरमध्ये दररोज १५ ते २५ हजार भाविक दर्शनासाठी येतात. मग पेड दर्शन (प्रतिव्यक्ती २०० रुपये) पासची मर्यादा ३ हजारापर्यंतच (२० टक्के) मर्यादित का ठेवली आहे. खरे तर ही व्यवस्था महत्त्वाच्या किंवा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना पटकन दर्शन घेता यावे, यासाठी निर्माण केलेली आहे. पण त्यांच्या आडून पुजारी, विश्वस्त व स्थानिकांच्या सांगण्यावरून खुष्कीच्या मार्गाने दर्शनासाठी सोडले जाते.
अधिकृत पेड दर्शनाचा पास घेणाऱ्या भाविकांना मर्यादित ठेवून या व्यवस्थेने अनधिकृतपणे पैसे कमाविण्याचा हा राजमार्गच निवडला आहे. पेड दर्शनाची मर्यादा वाढली तर मंदिर ट्रस्टच्या तिजोरीत अधिकृत पैसे जमा होतील, पण ही सुविधा नाकारण्याचे किंवा मर्यादित ठेवण्यामागे हेच राजकारण दडले आहे.
मारहाणीच्या अनेक घटना उघडकीस
१२ सप्टेंबर २०१५
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात माजी नगराध्यक्ष लक्ष्मिकांत थेटे यांना विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल यांनी मारहाण केल्याचा तक्रार दाखल आहे. याप्रकरणी तर अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.
७ सप्टेंबर २०२१
मंदिरातील सफाई कर्मचारी कैलास देशमुख यांना साफसफाई करत नाही म्हणून सत्यप्रिय शुक्ल यांनी घंटा फेकून मारल्याची तक्रार त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आलेली आहे. हे प्रकरण अद्याप निकाली निघालेले नाही.
५ नोव्हेंबर २०१४
स्थानिक पुरोहित आनंद अंबादास शौचे हे वैकुंठ चतुर्दशीला मंदिरात पूजेसाठी बसलेले असताना त्यांना जागेवरून उठवून देण्यात आले.
२० सप्टेंबर २०२५
पार्किंगच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या व्यक्तींनी नाशिकच्या चार ते पाच पत्रकारांना बेदम मारहाण केली. या घटनेची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वसुलीचा ठेका तत्काळ रद्द केला. सैन्य दलातील सैनिक, सीमा सुरक्षा दलाचे जवान, वकील, डॉक्टर व महिला या सर्वांना मारहाण झाल्याची घटना आजवर घडलेली आहे. मात्र, वेळेअभावी किंवा शासकीय नोकरीत बाधा नको म्हणून अनेकांनी तक्रार दाखल केलेली नाही. येथेच मंदिर विश्वस्त व पोलिसांचे फावते आणि प्रकरण दाबले जाते. त्र्यंबकेश्वरमध्येच असे प्रकार वारंवार का घडतात, याचाही शोध घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
दर्शन विलंबाची कारणे
१) मंदिराच्या परिसरात फूल, प्रसाद, धार्मिक व पूजा विधी साहित्य विक्रेते, रिक्षाचालक, हात विक्री करणारे व्यावसायिक व हॉटेल व्यावसायिकांनी गर्दी केल्यामुळे प्रवेशद्वार सापडत नाही.
२) पेड दर्शन पास काऊंटर कुठे आहे, याविषयी भाविकांना सहजगत्या माहिती मिळत नाही. ऑनलाइन पासचे एक काऊंटर थेट कुशावर्ताजवळ असल्याने इथपर्यंत भाविक पोहोचतच नाही.
३) भाविकांना उत्तर दिशेचे प्रवेशद्वार हे मुख्य प्रवेशद्वार वाटते आणि तेथूनच प्रवेश मिळवण्यासाठी त्यांचा आग्रह असतो. या व्यतिरिक्त पूर्व प्रवेशद्वार किंवा पेड दर्शन रांगेपर्यंत कसे पोचायचे याविषयी माहिती मिळत नाही.
४)शहरात प्रवेश करताच भाविकांना हेरणारे दलाल त्यांची दिशाभूल करतात. मंदिरात दर्शन, कुशावर्त तीर्थक्षेत्रापर्यंत जाण्यासाठी मोकाट जनावरे, भटकी कुत्री व रस्त्यावरील वाहनांतून मार्ग काढावा लागतो.
Panchang 5 March 2026: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्राचे पठण आणि ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावाप्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली असून ही समिती तपास करत आहे. सीसीटीव्ही फुटेज व परिस्थितीजन्य पुरावे यांची खातरजमा केली जाईल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील योग्य ती कारवाई केली जाईल.
- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक
भाविकांना हाणामारीचे समर्थन कदापी करता येणार नाही. येथील सुरक्षारक्षकांना आम्ही प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा घटनांमुळे देवस्थानचे प्रतिष्ठेला धक्का बसतो. भाविकांचे दर्शन अधिक सुलभ पद्धतीने कसे होईल, याचा आम्ही विचार करीत आहोत.
- पुरुषोत्तम कडलग, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट
त्र्यंबकेश्वर भाविक मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, संबंधित सुरक्षारक्षकांना चौकशीसाठी बोलविले होते. त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येईल.
- महेश कुलकर्णी, पोलिस निरीक्षक, त्र्यंबकेश्वर
भाविक काय म्हणतात...
दर्शन अधिक सुलभ व्हावे
तासनतास रांगेत उभे राहिल्यानंतर दोन मिनिटे शांततेत दर्शन घेता आले पाहिजे. आम्ही इतक्या दूरवरून फक्त देवाचरणी माथा टेकवण्यासाठी येतो.
- अमृत भागवत, सातारा
आदर राखला पाहिजे
प्रत्येकाच्या भावनांचा आदर राखला गेला पाहिजे, तरच देवस्थानचे महत्त्व टिकून राहील. सोयी-सुविधा वाढविल्या तर भाविकांची तिर्थक्षेत्राला येण्याची भावना निर्माण होईल.
- नवीन मोदी, सूरत
भाविकांमुळे मान
सर्वसाधारण परिस्थितीत दर्शनाची ही अवस्था असेल तर येणाऱ्या कुंभमेळ्यात काय बघायला मिळेल, याचा अंदाज येत नाही. भाविक आहेत म्हणून येथील व्यवस्थेला मान आहे, याचा विसर पडता कामा नये. भाविकांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे.
- चंद्रिका बेन, सूरत