Nashik Krushikumbh : नाशिकमध्ये 'कृषिकुंभ-२०२६'चा जागर! एआय तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीचे मिळणार धडे
esakal March 06, 2026 03:45 AM

नाशिक: बदलत्या काळानुरूप शेती क्षेत्राला आधुनिकतेची जोड देताना शेतकऱ्यांना जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासह ‘एआय’च्या सहाय्याने शेतीचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण एकाच छताखाली मिळणार आहे. शहरातील बळी मंदिर चौकातील यूथ फेस्टिव्हल मैदानावर १२ ते १६ मार्च या काळात आयोजित कृषिकुंभ- २०२६ महोत्सवातून शेतकऱ्यांना ही संधी उपलब्ध होईल. महाराष्ट्राची हास्य जत्रा, फोक लोक, तसेच खाऊ गल्ली हे महोत्सवातील प्रमुख आकर्षण असणार आहे.

जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, आत्मा आणि माविम यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाच्या तयारीसंदर्भात बुधवारी (ता. ४) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, यंदाचा कृषिकुंभात आधुनिक शेतीवर भर देण्यात आला आहे. तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) शेतीतील वापर हे प्रमुख आकर्षण असेल. एआय तंत्रज्ञानाच्या थेट प्रात्यक्षिकासह त्याच्या वापराबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे शेतीची कामे सुलभ करताना ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष सादरीकरण पाहायला मिळेल, असे प्रसाद यांनी सांगितले.

रवींद्र माने यांनी, महोत्सवात चारशे स्ट्रॉल्स उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये आधुनिक कृषी अवजारे, खते व बी-बियाणे, बदलते तंत्रज्ञान, तसेच कृषीसंबंधित दालने असतील, अशी माहिती दिली. यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी संकल्पनेवर आधारित असल्याने अधिकाधिक महिला शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे.

महोत्सवात प्रयोगशील शेतकऱ्यांच्या परिसंवादासह शेतीतील जुगाड ते तंत्रज्ञानावर आधारित स्पर्धा होणार आहे. त्यातील विजेत्यांना सन्मानित केले जाईल. विशेष म्हणजे, त्यात एक महिला शेतकऱ्याचा सन्मान करण्यात येईल, असे माने यांनी सांगितले. याप्रसंगी महोत्सवाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग, भाजप उमेदवार विधानभवनात; शरद पवार, पार्थ पवार अर्ज दाखल करणार

महोत्सवाचे वैशिष्ट्ये

अन्नप्रक्रिया उद्योगांचे विशेष दालन

बँका व शासकीय योजनांचे स्टॉल

शासकीय योजनांच्या अर्जाची सुविधा

नैसर्गिक शेती, बायोचारचे प्रात्यक्षिक

शेततळ्यामध्ये मत्स्यपालनाचे प्रशिक्षण

खाऊ गल्लीत खाद्यसंस्कृतीचे ६२ स्टॉल्स

प्रत्येक गावातून बसद्वारे ६० शेतकऱ्यांना नेण्याचे नियोजन

सांस्कृतिक मेजवानी

महोत्सवात प्रयोगशील शेतकरी, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना सन्मानित केले जाईल. तर १३, १४ व १५ मार्चला दररोज दुपारी एकला तज्ज्ञ मार्गदर्शकांचे चर्चासत्र होईल. तसेच शनिवारी (ता. १४) सायंकाळच्या सत्रात ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम कार्यक्रम, तर रविवारी (ता. १५) ‘फोक लोक’ हा पारंपरिक लोककलेचा आविष्कार प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत सर्वांसाठी खुले असून, शेतकरी व नागरिकांनी त्यास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.