भोसरी, ता. ५ ः स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर भोसरीतील धर्मवीर ट्रेकर्स संस्थेद्वारे ‘माझा गड, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत स्वच्छता मोहीम अभियान राबविण्यात आले. या मोहिमेअंतर्गत गडावरील प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्यांसह विविध कचरा गोळा करुन येणाऱ्या शिवभक्तांमध्ये जनजागृती करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे शुक्रवारी (ता. ६) साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त भोसरीतील धर्मवीर ट्रेकर्स संस्थेद्वारे रायगडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेची सुरुवात पाचाड येथील जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधीस्थळाला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या मोहिमेत स्थानिक नागरिकांसह संस्थेचे अध्यक्ष रवी गायकवाड, विनय दुराफे, विवेक वामने, सुधीर शेडगे, स्वप्निल बोडके, कुणाल वाळुंज, अविनाश गायकवाड, गणेश गावले, गणेश गायकवाड, सुबोध वामने, अमेय गावले, मयूर भिसे आदींसह बालचमूंनी सहभाग घेतला.
या मोहिमेत गडावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि पिशव्यांचा कचरा मोठ्या प्रमाणात गोळा करण्यात आला. त्याचप्रमाणे गडावरील इतरही कचरा गोळा करण्यात आला. गेल्या दोन वर्षांत संस्थेद्वारे रायगड किल्ल्यासह शिवनेरी, चावंड, कुंजरगड, जीवधन, विश्रामगड, शिरपुंजेचा भैरवगड आदी किल्ल्यांवरही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गडाच्या स्वच्छतेविषयी नागरिकांत जनजागृती करत आपला ऐतिहासिक वारसा जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असा संदेश देण्यात आला. त्यास शिवभक्त आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जनजागृती करणार
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या पाऊलखुणा गड-किल्ल्यांवर दिसतात. छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्यांचे कर्तृत्व अनुभवण्यासाठी शिवप्रेमींद्वारे गड-किल्ल्यांना भेटी दिल्या जातात. मात्र, काहींद्वारे प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्यांसह इतर कचरा गडावर फेकला जात असल्याने गड-किल्ल्यांचे विद्रुपीकरण होते. ते टाळण्यासाठी येत्या काळात गड-किल्ल्यांच्या स्वच्छतेसाठी नागरिकांत जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम उघडण्यात येणार असल्याची माहिती धर्मवीर ट्रेकर्स संस्थेद्वारे देण्यात आली.
दर महिन्याला आमच्या संस्थेच्या सदस्यांद्वारे निधीचे संकलन केले जाते. हा जमलेला निधी रायगडावरील राज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडे दिला जातो. त्याचप्रमाणे ६ जून राज्याभिषेक सोहळ्यात येणाऱ्या शिवभक्तांना सोहळ्याचे योग्य दर्शन होण्यासाठीची व्यवस्था करण्याची जबाबदारी संस्थेद्वारे दरवर्षी चोख पाडली जाते.
- रवी गायकवाड, अध्यक्ष, धर्मवीर ट्रेकर्स, भोसरी