इराण-इस्रायल युद्धाचा भडका, राज्य सरकारचा मोठा निर्णय, इंडस्ट्रीसाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद, दोन दिवसात व्यावसायिक गॅसही बंद होणार?
विजय केसरकर, एबीपी माझा March 06, 2026 02:13 PM

Iran vs Israel war: इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षामुळे आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या झळा आता भारतातही जाणवू लागल्या आहेत. संभाव्य गॅस तुटवड्याचा विचार करून राज्य सरकारने गॅसचा वापर कमीत कमी करण्यावर भर देत उद्योगांसाठी लागणाऱ्या 47 किलो आणि 450 किलो क्षमतेच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती वापराचा गॅस पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली असून व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या नव्या ऑर्डर घेऊ नयेत, अशा सूचना डीलर्सना देण्यात आल्या आल्याची माहिती समोर येत आहे. 

Iran vs Israel war: डीलर्सना स्पष्ट सूचना

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील बीपीसीएलच्या शिक्रापूर प्लांट आणि एचपीसीएलच्या चाकण प्लांट येथून देखील डीलर्सना सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्लांट प्रशासनाने डीलर्सना व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी गाड्या पाठवू नयेत, तसेच नव्या ऑर्डर स्वीकारू नयेत, असे निर्देश दिले आहेत. व्यवसायिक वापरासाठी उपलब्ध असणारे 5, 19, 35, 47 आणि 427 किलो क्षमतेचे सिलेंडर सध्या पुरवठ्यासाठी थांबवण्यात आले आहेत. यामुळे हॉटेल व्यवसाय, रेस्टॉरंट्स तसेच विविध उद्योगांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील दोन दिवसांत व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Iran vs Israel war: उद्योग आणि हॉटेल व्यवसायावर परिणाम

व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर प्रामुख्याने हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि औद्योगिक क्षेत्रात केला जातो. धातू वितळवणे, पावडर कोटिंग, विविध उत्पादन प्रक्रिया अशा अनेक कामांसाठी हा गॅस अत्यावश्यक असतो. त्यामुळे पुरवठा थांबल्यास उद्योग आणि हॉटेल व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. सध्या उपलब्ध असलेला मर्यादित साठाच व्यावसायिकांना वितरित केला जाणार असून त्यानंतर नवीन पुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे.

Iran vs Israel war: घरगुती गॅसला प्राधान्य

सरकारकडून घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. कारण युद्धामुळे आखाती देशांमधील ऊर्जा पुरवठा साखळीवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतातील ऊर्जा बाजारावर किती काळ जाणवेल, याकडे उद्योग आणि व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

Iran Israel Conflict Affect In India: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या, सरकारकडून महत्वाचे आदेश

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.