ढिंग टांग : खरातो एकचि धर्म..!
esakal March 31, 2026 07:45 AM

व्यर्थ ज्ञानेश्वर । व्यर्थ झाला तुका ।

एका झाला मुका । वाचा गेली ॥

व्यर्थ गाडगेबाबा । व्यर्थ तुकडोजी ।

फुकाचे गुरुजी । ठरले आता ॥

शिकविले यांणी । तुम्हा आम्हां सारे ।

विचारांचे वारे । घुमविले ॥

आंधळ्या श्रध्देचे । झाले निर्मूलन ।

विज्ञान विज्ञान । गजर हो झाला ॥

ज्ञानाचे पवन । वाहिले वाहिले ।

इकडुनि आले । तिकडे गेले ॥

पुरोगामी झाला । अमुचा महाराष्ट्र ।

आणि धष्टपुष्ट । विकासाने ॥

सारे काही आता । उलटे पालटे ।

संताची सालटे । निघती देखा ॥

खड्ड्यामाजी गेली । संतांची वचने ।

नेत्यांची भाषणे । मतांलागी ॥

तोचि गा पारधी । ज्याच्या हाती ससा ।

करा खाली खिसा । बाकीच्यांनी ॥

दुनिया कसली । वेड्यांचा बाजार ।

जिथे होते ठार । विवेकबुध्दी ॥

मंत्र तंत्र शक्ती । जारण मारण ।

माया वशीकरण । विज्ञानची ॥

करा आता सुरु । ढोंगाचे स्टार्टप ।

पैशाचे वाटप । खोऱ्याने हो ॥

नीतीअनीतीचा । नको बडिवार ।

परमार्थ उच्चार । करु नका ॥

हरामाचे खोके । बाई नि बाटली ।

हीच गा वाटुली । विकासाची ॥

ढोंगियांचा ढाबा । भोंदूंचेच मठ ।

बेरकी महाखट । जमा झाले ॥

हवाला वेव्हार । जादूटोणा मंत्र ।

हेच नवे तंत्र । विकासाचे ॥

अहाहा तो काय । जादुई आईना ।

पल्याडचे दिसेना । अल्याडास ॥

नाडलेली बाई । बरी बोलवावी ।

तिला लुंगवावी । ऐसपैस ॥

टेबलाखालतें । चाले व्यवहार ।

करा बेदरकार । उघड्यावरी ॥

मेंढरांच्या कळपीं । घुसतो लांडगा ।

हापसे दांडगा । तैसा जेवी ॥

ऐसे गा हे गुरु । देती अनुग्रह ।

जेणे शिष्येसह । मज्जा येई ॥

विकार वासना । हेची गुण माना ।

विकृतास जाणा । उपासना ॥

हपिसाचे मेज । झाला गा पलंग ।

कृपेचाच संग । घडे तेव्हा ॥

बुवाबाजी श्रेष्ठ । किंवा बाईलबाजी ।

येथे दोन्ही काजी । लागलेल्या ॥

बुवाचिया वेठी । बाई पेपरवेट ।

मेजावरी थेट । विराजती ॥

अरे अरे देवा । काय आली वेळ ।

दुष्टांचा सुकाळ । सुरु झाला ॥

बुवाच्या चरणी । पुढाऱ्याचा माथा ।

काय सांगू गाथा । विकासाची ॥

असले कसले । अमुचे हे नेते ।

त्यांना फक्त मते । दिसतात ॥

नंदी म्हणे यांना । माराव्या पैजारा ।

एकालागी बारा । मोजू नये ॥

जोवरी जोरात । असले खरात ।

निघते वरात । वाटे लाज ॥

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.