सध्या जगभरात युद्धाचे सावट असताना दुसरीकडे एका देशाला निसर्गाच्या कोपाचा सामना करावा लागला. पूर्व इंडोनेशियातील मोलुक्का समुद्रात ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या भूकंपामुळे केवळ जमीनच हादरली नाही, तर समुद्रात त्सुनामी लाटा उसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आशियातील तीन देशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार ६.४८ वाजता हा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू टेर्नाटे बेटाजवळील समुद्रात जमिनीखाली ३५ किलोमीटर खोलीवर होता. परंतु या भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की केंद्रबिंदूपासून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरांमधील इमारतींना मोठे हादरे बसले.
त्सुनामीचा हाय-अलर्ट
भूकंपानंतर काही मिनिटांतच हवाई येथील पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने धोक्याचा इशारा जारी केला. भूकंपाच्या केंद्रापासून १००० किलोमीटर त्रिज्येच्या आत असलेल्या किनारपट्ट्यांना धोका आहे. त्यामुळे इंडोनेशियासह शेजारील फिलीपिन्स आणि मलेशियाच्या काही भागांना त्सुनामीच्या लाटा धडकण्याची भीती आहे. किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना तातडीने आपली घरे सोडून उंचावर असलेल्या सुरक्षित स्थळी जावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
जनजीवन विस्कळीत आणि भीतीचे वातावरण
या भूकंपानंतर उत्तर सुलावेसी प्रांताची राजधानी मनाडो आणि टेर्नाटेमध्ये भूकंपाच्या वेळी मोठी पळापळ झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी शाळा भरण्याची वेळ असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांनी वर्गातून मोकळ्या मैदानांकडे धाव घेतली. तर काही लोक झोपेत असतानाच जोरदार धक्के बसल्याने घरातील सामान पडू लागले. ज्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. त्यासोबतच त्सुनामीच्या भीतीमुळे किनारपट्टीवरील हजारो नागरिक मोटारसायकल आणि गाड्यांमधून डोंगराळ भागाकडे जाताना दिसत आहेत.
इंडोनेशिया आणि भूकंपाचे सत्र
इंडोनेशिया हा देश पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर स्थित आहे. त्यामुळे येथे वारंवार भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात. यापूर्वी २००४ मध्ये सुमात्रा बेटाजवळ झालेल्या ९.१ तीव्रतेच्या भूकंपामुळे आलेल्या त्सुनामीने हिंदी महासागरातील देशांमध्ये हाहाकार माजवला होता, ज्याची आठवण आजच्या घटनेने पुन्हा ताजी केली आहे. सध्याच्या परिस्थितीत बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.