अनेकदा लोक समोरच्याचा फिटनेस त्याची शारीरिक तंदुरुस्ती, 6 पॅक एब्स, छाती आदी पाहून ठरवतात. पण सायन्सनुसार एखाद्याच्या फिटनेसचं अचूक मोजमाप करण्याची पद्धत म्हणजे शरीराचं संतुलन, बॅलन्स. मेयो क्लिनिक आणि अन्य रिसर्च इंस्टीट्यूट्सच्या रिपोर्ट्समधून हे समोर आलय. एखादा व्यक्ती कितीवेळ त्याच्या एकापायावर उभा राहू शकतो. त्यावरुन त्याची न्यूरोमस्कुलर एजिंग (नसा आणि मसल्सच्या वृद्धत्वाचा वेग) हा सर्वात मोठा संकेत आहे. जर, तुम्ही तुमच्या वयाच्या हिशोबाने ठरवलेल्या वेळेपर्यंत बॅलन्स करु शकत नसाल, तर तुमच्या फिटनेसवर प्रश्न निर्माण होऊ शकतो. भविष्यात पडणं, दुखापत होणं आणि अन्य आरोग्य समस्यांचा संकेत असू शकतो.
रिपोर्टमध्ये वयाच्या हिशोबाने काही निकष दिले आहेत. जर, तुमचं वय 18 ते 39 दरम्यान असेल तर तुम्ही कमीत कमी 43 सेकंद एका पायावर उभं राहिलं पाहिजे. 40 ते 49 वयोमान असलेल्यांसाठी हा वेळ 40 सेकंद आहे. जसंजसं वय वाढत जातं ही क्षमता कमी होऊ लागते. 50 ते 59 वयोगटासाठी 37 सेकंद, 60 ते 69 वयोगटासाठी 30 सेकंद आणि 70 ते 79 वर्षाच्या वृद्धांसाठी 18 ते 19 सेकंदांचा वेळ चांगला मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीचं वय 80 च्या वर आहे आणि तो 5 सेकंदही विना आधार उभा राहत असेल, तर त्याची शारीरिक स्थिती समाधानकारक आहे.
एका पायावर उभं राहता न येणं हे कसलं लक्षण?
ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये पब्लिश्ड झालेल्या एक स्टडी रिपोर्टमध्ये हैराण करणारा दावा करण्यात आला आहे. मध्यम वयीन किंवा वृद्ध अवस्थेतील जे लोक कमीत कमी 10 सेकंदही एका पायावर उभे राहू शकत नाहीत, त्यांच्यात ही टेस्ट पास करणाऱ्यांपेक्षा पुढच्या 10 वर्षात मृत्यूचा धोका जास्त असतो. रिसचर्सनुसार खराब संतुलन हे कमकुवत हाडं आणि ह्दयरोगाशी सुद्धा संबंधित असू शकतं.
यात चांगली गोष्ट काय?
वैज्ञानिकांनुसार आपला चालण्याचा स्पीड किंवा हाताच्या पकडींच्या तुलनेत संतुलन जास्त वेगाने कोसळतं. संतुलन चांगलं राहण्यासाठी आपलं डोकं, नजर आणि शरीराच्या नसांमध्ये चांगला समन्वय आवश्यक आहे. चांगली गोष्ट म्हणजे यात सुधारणा करता येऊ शकते. रोज एका पायावर उभं राहण्याच्या सरावामुळे फक्त तुमचं संतुलनच सुधारत नाही तर हे तुमच्या डोक्याला सुद्धा सक्रीय ठेवतं.