स्मार्ट माहिती : आयटी कंपन्या कात टाकत आहेत!
esakal April 06, 2026 06:45 AM

अतुल कहाते, तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक-विश्लेषक

अपेक्षेप्रमाणेच भारतातील प्रमुख आयटी कंपन्यांनी ‘एआय’च्या झपाट्याशी जुळवून घेण्यासाठी वेगाने पावले टाकायला सुरुवात केल्याची चिन्हे दिसायला लागली आहेत. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, एचसीएल, टेक महिंद्रा या आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या ‘बेंच’मध्ये तब्बल पावपट घट झाली आहे. ज्या लोकांना प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम नसते; पण भविष्यात येऊ घातलेले काम करू शकतील, त्यांना या कंपन्या काही काळ फुकट पगार देत राहतात. या लोकांच्या संचाला ‘बेंच’ म्हणतात. मोठ्या स्वरूपाची कामे मिळाल्यावर ती पूर्ण करण्यासाठी अशा राखीव लोकांचा साठा मोठ्या प्रमाणात असे. आता मात्र ‘एआय’ने ही सर्व समीकरणे पार बदलून टाकली आहेत. कंपन्यांकडे मनुष्यबळ किती, या निकषाला आता पूर्णपणे छेद मिळालेला असून, ‘एआय’चा वापर करून लोक किती वेगाने आणि किती प्रमाणात आपले काम पूर्ण करू शकतात, हाच कळीचा मुद्दा बनलेला आहे.

आयटी कंपन्या नफ्यात

या नव्या परिस्थितीशी आयटी कंपन्या भराभर जुळवून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कमी मनुष्यबळ आणि जास्त ‘एआय’ यांचा वापर करणे हे आता सर्वच कंपन्यांचे धोरण असणार आहे. साहजिकच गेले काही महिने गुंतवणूकदारांनी आयटी कंपन्यांच्या शेअरची तुफान विक्री केलेली असली, तरी हळूहळू आयटी कंपन्या पुन्हा चांगला नफा कमावण्याची शक्यता दिसते. अर्थातच, कंपन्या या नव्या जगामध्ये तुलनेने वेगाने स्थिरस्थावर होत असल्या, तरी आयटी कर्मचारी वर्गामध्ये मात्र, विलक्षण अस्थिर वातावरण आहे. ‘एआय’शी संबंधित असलेली कौशल्ये अवगत करून त्यांचा वापर आपल्या कामात करणे आता ऐच्छिक राहिलेले नसून, त्याशिवाय उद्याच्या जगात टिकून राहणेच अशक्यप्राय झाले आहे. स्वाभाविकच कंपन्यांचे शेअरधारक हळूहळू पुन्हा नफ्याच्या दिशेने वाटचाल करणार, असे चित्र दिसत असले, तरी आयटी कर्मचारी वर्गाची मात्र मोठ्या प्रमाणावर वाताहत होण्याची चिन्हे दिसतात. तुलनेने कमी मनुष्यबळ राबवून जास्त नफा कमावण्याची संधीच एक प्रकारे आयटी कंपन्यांसमोर या रूपाने चालून आली आहे. साहजिकच आत्ता वाटते तितकी दुर्दशा आयटी कंपन्यांच्या वाट्याला येणार नाही, हे आपण जवळपास खात्रीने सांगू शकतो. अगदी पूर्वीची अति उच्च नफ्याची परिस्थिती कदाचित नसेलही; पण आयटीमध्ये नव्या प्रकारचे वैभव नजीकच्या भविष्यात येणार; हे नक्की!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.