तारापूर एमआयडीसी कारवाईवर प्रश्नचिन्ह
गरिबांच्या झोपड्यांवर हातोडा, टपऱ्यांना मोकळीक?
बोईसर, ता. १२ (तारापूर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे एमआयडीसी प्रशासनावर दुहेरी निकषांचा आरोप होत आहे. रोजंदारी कामगारांच्या तात्पुरत्या झोपड्या बुलडोझरने पाडून शेकडो कुटुंबांना बेघर करण्यात आले, तर अनेक ठिकाणी उभारलेल्या अनधिकृत कायमस्वरूपी टपऱ्यांवर मात्र कारवाई न झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
खैरापाडा परिसरातील कारवाईनंतर नागरिकांचे संसार उघड्यावर आले असून, सर्वांवर समान कारवाई का नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. चित्रालय परिसरातील ‘ओटला मार्केट’वरील कारवाईतही निवडक बांधकामांवरच हातोडा चालवल्याची चर्चा आहे. दरम्यान, ही कारवाई केवळ थातूरमातूर असल्याची टीका होत आहे. सकाळी हटवलेल्या व्यावसायिक टपऱ्या संध्याकाळपर्यंत पुन्हा उभ्या राहत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा शासकीय खर्च होऊनही कोणताही ठोस परिणाम होत नसल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. यामुळे एमआयडीसीच्या कारवाईचा प्रभाव, सातत्य आणि पारदर्शकता यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.