कु. सरोज चंदनवाले
नमस्कार! एका वेगळ्याच तरल विषयावर आज मी चिंतन करतेय. चिंतन करणं हा माझा स्वभावच आहे. संधी मिळेल तेव्हा मी चिंतन करत्ये. यावेळी अचानक मला चिंतनासाठी वेगळाच विषय मिळाला. मिळाला कसला? अगदी हातात गावला! गेली कित्येक वर्षं किंवा महिने मी बघत्येय, पुण्यातले अत्यंत चहाटळ लोक मला ‘आण्टी’ अशी हांक मारू लागले आहेत. परवा कोथरूडहून मी कुठं तरी निघाल्ये होते, तेव्हा रिक्षावाल्याने मला चक्क ‘आंटी छुट्टा देना’ असं हिंदीत सांगितलं. उर्मट मेला! एक तर पुण्यात माझ्याशी हिंदीत बोलला, वर मेला आंटी म्हणाला. तळपायाची आग मस्तकाला गेली. राजसाहेब ठाकऱ्यांना तुझ्या रिक्षाचा नंबर देईन असा दम मारल्यावर मराठीत म्हणतो कसा? -‘‘बरं आंटी, माझा चुकला!’’
रिक्षावाल्याने आंटी म्हटल्याच्या उद्वेगातच माझ्या मनरुपी कवठी चाफ्याच्या भोवती विचारांचा भुंगा गुंजारव करू लागला. मी तर आमच्या सोसायटीत क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी मला सरोजआंटी म्हटलं तर मुळीच चौकलेट देत नाही. नुसतं ‘हाय’ म्हटलं तर दोन चाकलेटंही देईन! त्यात भरीस भर म्हणून दाढीचे खुंट पिकलेल्या त्या परप्रांतीय, उपऱ्या, आगन्तुक रिक्षावाल्यानं आंटी का म्हटलं असेल? आत्ता कुठे उमलू लागलेल्या कळीला का कुणी फूल म्हणतं? मंद तेवणाऱ्या ज्योतीला का कुणी मशाल म्हणतं? उद्या बुलबुलाला माकड म्हणाल!! मी अंतर्मुख झाल्ये. ताबडतोब एक मतला सुचला. अर्ज किया है-
आंटी कुणा म्हणावे, जगतास ठाव नाही,
पेठेत कोळश्याच्या सोन्यास भाव नाही...
...पुढे गजल ‘होत’ असतानाच, तेवढ्यात पेपरात बातमी वाचली. इंग्लंडात (की आणखी कुठे तरी परदेशात) इल्डा नावाच्या एका भारतीय वंशाच्या कर्मचारिणीला इस्पितळातली (तरुण) नर्स कायम ‘आंटी’ अशी हांक मारायची. इल्डाताई भडकायच्या. ती तरुण नर्स घाना देशातली होती. घानात म्हणे, आंटी हे आदरार्थी संबोधन आहे. इल्डाताईनी तिला थेट कोर्टात खेचलंन. सगळे साक्षीपुरावे केल्यानंतर आदरणीय कोर्टानं इल्डाताईंच्या मनाला यातना झाल्याचं मान्य करून त्यांना दीड हजारभर पौंड नुकसान भरपाई द्यायला लावली. घानात ‘आंटी’ हे छान असलं तरी इतरत्र ते घानच आहे, हे माननीय कोर्टानं मान्य केलं. हा खूप मोठा विजय मानला पाहिजे.
इल्डाताईंना इल्डाकाकू म्हणणं हे निषिद्धच. कु. सरोजला आंटी म्हणणं तर धिक्कारार्ह. एखाद्या तरुणीस आंटी असं पुकारणं हा दंडनीय अपराध असला पाहिजे. दुर्दैवानं आमच्यासारख्या स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या या यातनांचं प्रतिबिंब ना समाजात पडत, ना साहित्यात. तरुण-तरुणींची कुचंबणा साहित्यात अनेकदा आली, अजूनही उमटते. वार्धक्यातले भोगही प्रतिबिंबित होत असतात. पण आमच्यासारख्या यौवनातून मध्यमवयाकडे धीम्या धीम्या धीम्या गतीनं हलकेच पावलं टाकणाऱ्या वयोगटातल्या भगिनींच काय? आज अशा कितीतरी ‘आंट्या’ आपलं दुःख मूकपणे गिळत असतील. या स्त्रियांना कुणीच नाही का वाली? सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार...तुम्हाला आशिषकाका अशी हांक मारु का अं? सांगा, सांगा ना...
समस्त तारुण्यसुलभ भावनांचा अर्करुपी मध पुढे करून मी आवाहन करत्ये की ताई म्हणा, वैनी म्हणा, पण आंटी म्हणू नका! महिलांना आंटी संबोधणं थांबवणं ही काळाची गरज आहे. मी तर याखातर उग्र साहित्य चळवळ उभी करण्याचा विचार करतेय...
अर्ज किया है...
चाफेकळीस आता झेंडू म्हणू नका रे...हा अर्थपूर्ण ‘आंटीचा गजल’ मी लिहायला घेतला, आणि पहिल्याच ओळीला अडल्ये! ‘झेंडू’चा काफिया सुचत नाही. कुणी सुचवेल का?...काय? काय म्हणालात? शी:…चहाटळ मेले!!