Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा
esakal April 26, 2026 02:45 AM

माले - मुळशी धरणाच्या जलाशयात मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचा लोकार्पण सोहळा पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते नुकताच पार पडला.

याप्रसंगी आमदार शंकर मांडेकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सभापती मंदा शेळके, माजी आमदार शरद ढमाले, कृषी समिती सभापती अमोल नलावडे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते. या लॉंचसेवेचा लाभ मुळशी धरणाच्या पलीकडील १६ गावांतील ग्रामस्थांना होणार आहे.

मुख्य रस्त्याने मोठा वळसा घालावा लागत असल्याने २० ते २५ किमी अंतर वाचणार आहे. या सेवेचा वाघवाडी, शिरगाव, वडगाव, वडुस्ते, भादसखोंडा, निंबारवाडी, भोरकस, वांद्रे या गावांना थेट फायदा होणार असून इतर गावांचे अंतरही लक्षणीय कमी होणार आहे.

आमदार शंकर मांडेकर म्हणाले, 'प्रशासक असल्यामुळे लॉंचसेवा सुरू होण्यास विलंब झाला. आता निवडणुका पार पडल्याने कामांना वेग येईल. मुळशी धरण परिसरातील सर्व रस्ते दर्जेदार करण्यात येतील.' विवेक वळसे पाटील यांनी लॉंचचे शुल्क नफ्यासाठी नसून देखभाल आणि दुरुस्तीसाठी असल्याचे स्पष्ट केले.

असे असणार शुल्क

प्रौढ व्यक्तीस २० रुपये, लहान मुलांना १० रुपये आणि मोटारसायकलसाठी ५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे; मात्र उत्पन्नाचे साधन नसलेल्या धरणग्रस्तांसाठी हे शुल्क जास्त असल्याने ते कमी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्यानुसार शुल्काचा फेरआढावा घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

दृष्टिक्षेपात

  • ४७ - प्रवासी क्षमता

  • ६ - दुचाकी नेण्याची सुविधा

  • ४ - दररोजच्या फेऱ्या

‘खानवडीसारखी शाळा मुळशीत करू’

मुळशी धरणग्रस्त मोठ्या प्रमाणात वंचित राहिले आहेत. हा अनुशेष दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तसेच मुळशी धरण परिसरात खानवडीप्रमाणे पहिली ते बारावी सीबीएसई माध्यमाची शाळा सुरू करू आणि मुळशी-वाघवाडी पुलासाठीही प्रयत्न करू, असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी दिले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.