नितीन बिनेकर
मुंबई : राज्यभर तंत्र-मंत्र आणि काळ्या जादूविषयी चर्चांना उधाण आले असतानाच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर मुंबईत असलेल्या सीएसएमटी स्थानकात काळ्या जादूचा एका प्रकाराने थरकाप उडवणारी खळबळ उडाली आहे. सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १ वरील खांब क्रमांक १५ आणि १६ वर ‘पॅरानॉर्मल’ असा शब्द, तसेच विविध गूढ स्वरूपाच्या आकृत्या आणि संख्यात्मक नोंदी लिहिलेल्या आढळल्याने प्रवाशांमध्ये भीती, संभ्रम आणि अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे.
प्रत्यक्ष पाहणीदरम्यान या खांबांवर स्केच पेनने काढलेले गोलाकार आकृतिबंध, दिशादर्शक बाण, मानवाकृतीसारखी रेखाटने, 'मुंबई', वर्ष २०१० ते २०२५ अशा कालावधीच्या नोंदी, तसेच '१००, २००, ५००, १००० कोटी' अशा आर्थिक संदर्भांच्या उल्लेखांचे जाळे दिसून येते. काही ठिकाणी '२४ तास सुरू' अशा आशयाचे शब्दही आढळतात. हे सर्व लिखाण एकमेकांशी जोडलेले असल्याचा भास होतो, जणू काही विशिष्ट कल्पना किंवा कथानक मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे दोन गंभीर प्रश्न पुढे आले आहेत. एक म्हणजे, वारसा दर्जा असलेल्या आणि जगप्रसिद्ध अशा सीएसएमटीसारख्या ठिकाणी अशा प्रकारचे विद्रूपीकरण कसे झाले? आणि दुसरे म्हणजे, हे केवळ कुणाच्या वैयक्तिक विचित्र कृतीचे उदाहरण आहे की यामागे काही वेगळा हेतू दडलेला आहे? ‘पॅरानॉर्मल’ या शब्दाचा संबंध अलौकिक किंवा विज्ञानाने न समजणाऱ्या घटनांशी जोडला जात असल्याने, काही प्रवाशांमध्ये काळ्या जादूशी निगडित भीती व्यक्त केली जात आहे.
- सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
दररोज लाखो प्रवासी ये-जा करणाऱ्या या स्थानकात सुरक्षा यंत्रणा, गस्त आणि देखरेख यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. इतक्या वर्दळीच्या ठिकाणी, तेही मुख्य फलाटावर, खांबांवर इतक्या तपशीलवार स्वरूपात लिखाण होणे आणि ते बराच काळ कोणाच्या नजरेत न येणे, ही बाब धक्कादायक मानली जात आहे.
- वारशाचे नुकसान गंभीर
वारसा संवर्धनाच्या दृष्टीनेही हा प्रकार गंभीर आहे. ब्रिटिशकालीन वास्तुशैलीत उभारलेली ही ऐतिहासिक इमारत केवळ वाहतुकीचे केंद्र नसून, देशाच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. अशा संरचनेवर पेन किंवा इतर साधनांनी केलेले लिखाण हे केवळ सौंदर्य बिघडवणारे नसून, त्यातून वारशाचे नुकसानही होते.
- चौकशीची मागणी वाढली
या पार्श्वभूमीवर, रेल्वे प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि संबंधित वारसा संरक्षण संस्थांनी तातडीने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, दोषींना शोधून काढून कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणाची स्थानकांवर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सखोल तपास सुरू आहे. संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची ओळख पटवण्यात येईल आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
- डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
मध्य रेल्वेचा कारभार जिथून चालतो, त्या जागतिक स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या सीएसएमटी हेरिटेज स्थानकात खांबांवर काळ्या जादूशी संबंधित स्वरूपाचे लिखाण आढळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा प्रकारांमुळे रेल्वेच्या सुरक्षेवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यामुळे रेल्वेने तात्काळ कारवाई करायला पाहिजे.
- लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय प्रवासी महासंघ
सीएसएमटीसारख्या जागतिक हेरिटेज स्थानकाचे असे विद्रूपीकरण होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. खांबांवर दिसणारे गूढ आणि संशयास्पद लिखाण हे केवळ दुर्लक्ष करण्यासारखे नाही. याची तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संघ