Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं
esakal April 26, 2026 02:45 AM

IPL 2026 RR vs SRH Marathi news: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत ३६ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात होत आहे. हा सामना जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर होत आहे.

या मैदानावरील हा पहिलाच आयपीएल सामना आहे. दरम्यान, या मैदानात पुन्हा एकदा १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची (Vaibhav Sooryavanshi) बॅट तळपली आहे. त्याने आक्रमक शतक केले. यासह त्याने मोठे विक्रम केले आहेत.

या सामन्यात राजस्थानने (Rajasthan Royals) प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद २२८ धावा केल्या. यामध्ये वैभव सूर्यवंशीने ३७ चेंडूत ५ चौकार आणि १२ षटकारांसह १०३ धावांची खेळी केली. वैभवने पहिल्या षटकापासूच आक्रमक खेळ केला होता. त्याने पहिल्याच षटकात प्रफुल हिंगेविरुद्ध सलग ४ षटकार मारले.

IPL 2026 : वैभव सूर्यवंशीचं वादळी शतक अन् RR चा धावांचा डोंगर! कमिन्सच्या नेतृत्वात SRH पहिला विजय मिळवणार?

विशेष म्हणजे गेल्या सामन्यात हिंगेने वैभवला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते. दरम्यान, यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर वैभवने डावाची जबाबदारी घेत आक्रमक फटकेबाजी केली. त्याने १५ चेंडूत अर्धशतक केले. ध्रुव जुरेलसोबत (५१) शतकी भागीदारी केली. त्याने नंतर ३६ चेंडूतच त्याचे शतक पूर्ण केले. त्यानंतर पुढच्या चेंडूवर तो साकिब हुसैनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.

वैभवचे विक्रम

वैभवने हे शतक करताना अनेक मोठे विक्रम रचले. त्याचे हे ३६ चेंडूतील शतक आयपीएलमधील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक ठरले. तसेच त्याचे स्वत:चे दुसरे जलद शतक ठरले.

आता आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक करणाऱ्या पहिल्या ५ जणांच्या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर वैभवचेच नाव आहे. गेल्यावर्षी जयपूरच्या याच मैदानात त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूत शतक केले होते. आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे.

याशिवाय आयपीएलच्या १९ वर्षांच्या इतिहासात ४० चेंडूच्या आत दोनवेळा शतक करणारा वैभव पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा पराक्रम कोणीही केला नव्हता. इतकेच नाही, तर आयपीएलमध्ये दोन शतके करणाराही तो पहिलाच अनकॅप्ड खेळाडू देखील ठरला आहे.

आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक

(Fastest IPL Century)

  • ३० चेंडू - ख्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पुणे वॉरियर्स, बंगळुरू, २०१३)

  • ३५ चेंडू - वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स वि. गुजरात टायटन्स, जयपूर २०२५)

  • ३६ चेंडू - वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स वि. सनरायझर्स हैदराबाद, जयपूर, २०२६)

  • ३७ चेंडू - युसूफ पठाण (राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स, मुंबई, २०१०)

  • ३७ चेंडू - हेनरिक क्लासेन (सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली २०२५)

  • ३८ चेंडू - डेव्हिड मिलर (किंग्स इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मोहाली, २०१३)

तिसऱ्यांदा १५ चेंडूत ५० धावा

दरम्यान, वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा १५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तो असं करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी आयपीएल २०२६ मध्येच चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांविरुद्ध त्याने १५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.

षटकारांचाही विक्रम

आयपीएलमध्ये डावाच्या पहिल्या षटकात ४ षटकार मारणारा वैभव पहिलाच खेळाडू ठरला आहे. इतकेच नाही, तर एका आयपीएल डावात १२ षटकार मारणारा वैभव पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने मुरली विजय आणि त्याला स्वत:लाच मागे टाकले आहे.

मुरली विजयने २०१० मध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी राजस्थान रॉयल्सविरुद्ध ११ षटकार मारले होते. तसेच गेल्यावर्षी २०२५ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना वैभवने ११ षटकार मारले होते.

आयपीएल डावात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय

(Most Sixes in an IPL Innings by Indian)

  • १२ षटकार - वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स वि. सनरायझर्स हैदराबाद, २०२६)

  • ११ षटकार - मुरली विजय (चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, २०१०)

  • ११ षटकार - वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स वि. गुजरात टायटन्स, २०२५)

  • १० षटकार - संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, २०१८)

  • १० षटकार - श्रेयस अय्यर (दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, २०१८)

  • १० षटकार - शुभमन गिल (गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, २०२३)

  • १० षटकार - अभिषेक शर्मा (सनरायझर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्स, २०२५)

  • १० षटकार - अभिषेक शर्मा (सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स, २०२६

IPL 2026: 16 चौकार, 9 षटकार... KL Rahulचे दीडशतक! १९ वर्षात कोणत्याच भारतीयाला न जमकलेला पराक्रम, Orange Cap ही मिळवली वैभवच्या १००० धावा

वैभव सूर्यवंशीने हे शतक करताना १००० टी२० धावाही पूर्ण केल्या. त्याने २६ डावात १००० धावा पूर्ण केल्या. तसेच त्याने ४७३ चेंडूत १००० टी२० धावा पूर्ण केल्या. त्यामुळे त्याने सर्वात कमी चेंडूत १००० टी२० धावा करण्याचा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम मिचेल ओवेनच्या नावावर होता. त्याने ५३३ चेंडूत १००० टी२० धावा केल्या होत्या.

इतकेच नाही, तर वैभवने १५ वर्षे २९ दिवस वय असताना १००० धावा टी२० क्रिकेटमध्ये पूर्ण केल्या. त्यामुळे तो १००० टी२० धावा करणारा सर्वात युवा खेळाडू देखील ठरला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.