मेहनत हाच यशाचा मंत्रा
मेरी कोम यांचा नवी मुंबईतील खेळाडूंना मोलाचा सल्ला
वाशी, ता. २७ (बातमीदार) ः कोणत्याही क्षेत्रात योग्यरितीने मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही हे लक्षात घ्या, त्याला बॉक्सिंगचे क्षेत्रसुद्धा अपवाद नाही, असे प्रतिपादन बॉक्सिंग चॅम्पियन पद्मविभूषण मेरी कोम यांनी केले. सातत्याने सराव, नवनवीन गोष्टी शिकण्याची इच्छा, जिद्द आणि चिकाटी हे अत्यंत महत्त्वाचे गुण असून, एका यशाने समाधानी न होता व एका अपयशाने खचून न जाता सतत खेळत राहणे हाच यशाचा खरा मंत्र असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नेरूळ येथील नेक्सस सीवूड मॉलमध्ये आयोजित आयबीए ग्लोबल बॉक्सिंग सीरिज आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. मरिन बॉक्सिंग अकॅडमी आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महापौर सुजाता पाटील, सभापती गिरीश म्हात्रे, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती उपायुक्त अभिलाषा पाटील, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, क्रीडापटू हितेश चौधरी व मरिन बॉक्सिंग अकॅडमीचे प्रमुख देवराज दास आदी मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई पालिकेच्या वतीने विविध खेळांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देऊन खेळांडूमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचे सांगत सुजाता पाटील यांनी मेरी कोम यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग चॅम्पियन या स्पर्धेच्या निमित्ताने नवी मुंबईत आल्याने या स्पर्धेची उंची वाढल्याचे सांगितले. यापुढील काळात सर्वच खेळांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहून प्रयत्न करण्यात येतील, असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी क्रीडा रसिक व विशेषत्वाने युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.